पवारांचा आदेश झुगारून भुजबळ समर्थक करणार शक्तिप्रदर्शन?

February 8, 2016 8:42 PM0 commentsViews:

प्रशांत बाग, नाशिक

08 फेब्रुवारी : छगन भुजबळ कुटुंबियांविरोधातल्या ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी जाहीरपणे आंदोलन करणार नाही, असं दस्तुरखुद्द शरद पवारांनी खरंतर यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तरीही भुजबळ समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. त्यामुळे अमेरिकेहून भुजबळ परत आल्यानंतर त्यांचे समर्थक कुठं कुठं आणि कसं शक्तीप्रदर्शन करताहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

1324938_Wallpaper1

भुुजबळांच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही राष्ट्रवादीतल्या भुजबळ समर्थकांनीच मोठ्या साहेबांचा आदेश झुगारून ठिकठिकाणी सरकारविरोधात आंदोलनं केली. नाशिकमध्ये बसेस देशील फोडण्यात आल्या. भुजबळांचा मतदारसंघ येवला आणि पंकजचा मतदारसंघ मनमाडमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलनं झाली. आता तर स्वत: छगन भुजबळ अमेरिकेहून परताहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मोठं शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. किंबहुना विमानतळावरच भुजबळांच्या समर्थनार्थ मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर करून टाकलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत आपण काहीसे एकाकी पडल्याचं लक्षात येताच भुजबळांनी नेहमीप्रमाणेच ओबीसीचा मुद्दा पुढे केला आहे. मी मागासवर्गीय असल्यानेच सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. म्हणूनच भुजबळांच्या या मुद्याला कितपत समर्थन मिळतंय हे मंगळवारच्या शक्तीप्रदर्शनावरूनच स्पष्ट होईल. तसंच भारतात परतल्यानंतर भुजबळ नेमकं काय बोलताहेत याकडेही राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

भुजबळांच्या शक्तीप्रदर्शनाची जयत्त तयारी

- समता परिषदेचे आणि माळी समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
– नाशिक जिल्हातून 500 गाड्या भरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघणार
– समता परिषदेचे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत धडकणार
– शक्तीप्रदर्शनाची नियोजनबध्द आखणी
– कार्यकर्ते ईडी कार्यालय, विमानतळ आणि राष्ट्रवादी भवनात जमणार
– मुख्य पदाधिकारी विमानतळावर जाणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close