डेव्हिड हेडली काय बोलणार ?, आजही साक्ष नोंदवण्यात येणार

February 9, 2016 8:48 AM0 commentsViews:


headley_newमुंबई – 09 फेब्रुवारी : 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीची आज (मंगळवारी) दुसर्‍या दिवशीची साक्ष सुरू झाली आहे. हेडली आजही अनेक गौप्यस्फोट कऱण्याची शक्यता आहे. सोमवारी झालेल्या साक्षीमध्ये, हा हल्ला पाकिस्ताननेच कसा घडवून आणला हे डेव्हिड हेडलीने यामध्ये स्पष्टपणे सांगितलं.

डेव्हिड हेडली हा मूळचा पाकिस्तानी असलेला अमेरिकन दहशतवादी आहे. याच डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्याच्या आधी सात वेळा मुंबईत येऊन रेकी केली होती. त्याने ताजमध्ये मुक्काम करून रेकीचे सर्व व्हिडिओ लष्कर ए तोयबाला दिले होते. डेव्हिड हेडली अमेरिकेत 35 वर्षांची शिक्षा भोगत आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवली जात आहे. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला त्याने ओळखले असून आपण त्याला साब म्हणतो असं त्याने काल कोर्टात सांगितलं. आपण, लष्कर ए तोयबात 2002 साली सहभागी झालो होतो. त्यानंतर मला भारतात पाठवण्यात आले असंही त्याने सांगितलं. एवढंच नाहीतर 26/11 हल्ल्याच्या आधी दोन वेळा मुंबईवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण, बोट पाण्यात बुडाल्यामुळे हा हल्ला फसला होता असा धक्कादायक खुलासही त्याने केला. डेव्हिड हेडलीची साक्ष अजून पूर्ण झालेली नाही. हेडली आज पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब देणार आहे. त्यामुळे तो आज काय सांगतो याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close