आज भुजबळांची ‘घरवापसी’, समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

February 9, 2016 9:00 AM0 commentsViews:

bhujbal_nashik_mumbai_acbनाशिक – 09 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गोत्यात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आज (सोमवारी) अमेरिकेहून भारतात परतणार आहेत. दुपारी 12 वाजता ते मुंबई एअरपोर्टवर येणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाचं आयोजन केलंय. विशेष, म्हणजे शरद पवारांनी आंदोलन करणार नाही असं जाहीर केलंय. पण त्यांचे आदेश झुगारून भुजबळ समर्थक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहे.

तर दुसरीकडे, आज सकाळी पंकज भुजबळांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. भुजळांच्या 9 कार्यालयांवर ईडीनं छापे टाकले होते आणि भुजबळ कुटुंबीयांच्या व्यवहारांकडे ईडी नजर ठेवून आहे.

दरम्यान, समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळही अडचणीत आले आहे. त्यांना आज हजर राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलंय. भुजबळ कुटुंबियांविरोधातल्या ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी जाहीरपणे आंदोलन करणार नाही. असं दस्तुरखुद्द पवारांनी खरंतर यापूर्वीच स्पष्ट केलंय. तरीही भुजबळ समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवलीय. राष्ट्रवादीत आपण काहीसे एकाकी पडल्याचं लक्षात येताच भुजबळांनी नेहमीप्रमाणेच ओबीसीचा मुद्दा पुढे केलाय. मी मागासवर्गीय असल्यानेच सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. म्हणूनच भुजबळांच्या या मुद्याला कितपत समर्थन मिळतंय हे शक्तीप्रदर्शनावरूनच स्पष्ट होईल. तसंच भारतात परतल्यानंतर भुजबळ नेमकं काय बोलताहेत याकडेही राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे अमेरिकेहून भुजबळ परत आल्यानंतर त्यांचे समर्थक कुठं कुठं आणि कसं शक्तीप्रदर्शन करताहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close