जवान तुझे सलाम !, 6 दिवस 25 फूट बर्फाखाली मृत्यूशी झुंज देऊन जवान सुखरूप

February 9, 2016 10:13 AM0 commentsViews:

siyachin_alive_javanसियाचीन – 09 फेब्रुवारी : देव तारी त्याला कोण मारी असं उगाच म्हटलं जात नाही. मागील आठवड्यात सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद झाले. परंतु, 25 फूट बर्फाखाली गाडला गेलेला एक जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावलाय. गेली 6 सहा दिवस या जवानाने मृत्यूशी झुंज देऊन सुखरुप बाहेर आलाय. लान्स नायक हणमनथापा कोप्पाड असं या वीर जवानाचं नाव आहे. कोप्पाड यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

उणे 50 अंश सेल्सियस तापमानाच्याखाली भारतीय जवान जीवाची बाजी लावून जगातील सर्वात खतरनाक अशा सियाचीनच्या युद्धभूमीत पहारा देताय. मात्र, निसर्गाच्या या भयावह कुशीत पहारा देणार्‍या जवानांना कधी कधी हतबल व्हावे लागते. मागील आठवड्यात जोरदार हिमस्खलन झाल्यामुळे भारतीय सैन्याचे 10 जवान बेपत्ता झाले. 2 दिवस शोधमोहिमेनंतर हे बेपत्ता जवान शहीद झाल्याचं जाहीर करावं लागलं. पण, जोपर्यंत जवानाने पार्थिव मिळत नाही तोपर्यंत शोध मोहिम सुरूच होती. आज सहा दिवसांनंतर एकाकी चमत्कार घडला.

19,500 फूट उंचावर जिथे श्वासही घेण्यास त्रास होतो अशा ठिकाणी 25 फूट बर्फाच्या ढिगाराखाली एक जवान मृत्यूशी झुंज देत असल्याचं आढळून आलं. लान्स नायक हणमनथापा कोप्पाड बर्फाच्या ढिगाराखाली जिवंत आढळून आले. आपला सहकारी सहा आठवड्यानंतरही बर्फाच्या कुशीत जिवंत लढा देत असल्याचा पाहुन जवानांना सुखदा धक्का बसला. जवानांनी तातडीने कोप्पाड यांना बाहेर काढलं आणि पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं. कोप्पाड यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

कोप्पाड हे कर्नाटक मधील धारवाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही बातमी त्यांच्या गावी पोहचवण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही सुखद धक्का बसला . दरम्यान, जवानांच्या या शोध मोहिमेत पाच जवानांचे पार्थिव सापडले आहे. चार जवानांची ओळख पटलीये अशी माहिती लेफ्टिनेंट कमांडर जनरल डी एस हुड्डा यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close