उच्चभ्रू कुटुंबातलं बुरसटलेलं जीणं, फक्त मुलगा जन्माला घालण्यासाठी केलं लग्न !

February 9, 2016 11:59 AM1 commentViews:

 
fake_marrigeठाणे – 09 फेब्रुवारी : एखाद्या टीव्ही सिरियलमध्ये घडावा असा प्रसंग एका अभागी मातेसोबत घडलाय. फक्त मुलांच्या हव्यासपोटी लग्न करुन महिलेला वार्‍यावर सोडण्याची घटना ठाण्यामध्ये घडलीये. अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा ताबा मिळविण्यासाठी गेली दीड वर्षे एक आई शक्य असेल त्या सगळ्यांचे दरवाजे ठोठावतीये. मात्र अजून तिला न्याय मिळालेला नाहीये. गेली दीड वर्ष ही महिला कोर्टाचे उंबरठे झिजवत आहे. काहीही करा पण माझे बाळ मला परत मिळवून द्या असा टाहो ही अभागी माता फोडत आहे.

“कुसुम मनोहर लेले” या सुप्रसिद्ध नाटकाशी साधर्म्य असलेली सत्य घटना ठाण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबात घडली आहे. केवळ मुलासाठी एका युवतीशी लग्न करून तिला परत माहेरी हाकलून देण्याची घटना उघड झाल्याने एक आई आपल्या बाळापासून तोडली गेली आहे. 7 फेब्रुवारी 2010 रोजी मुळची ठाण्याची असलेल्या अनामिका (नाव बदलले आहे) चा विवाह नाशिकच्या ऋषिकेश सुरेंद्र कर्डिले या युवकाशी मोठ्या थाटामाटात झाला. सुवर्ण भविष्याची स्वप्ने रंगवत लग्नाच्या 6 महिन्यांतच ती पती बरोबर लंडन येथे गेली आणि आपल्या नवीन संसारास सुरुवात केली.

काही महिन्यातच तिला बाळाची चाहूल लागली आणि ती आनंदली. परंतु तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण तिच्या नवर्‍याने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. लहान सहान गोष्टींवरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. त्यातच तिला एक गोंडस बाळ झाले. परंतु तिचा छळ काही संपला नाही उलट गोष्टी इतक्या थराला गेल्या की, तिच्या सासरच्यांनी तिचे बाळ हिरावून घेऊन तिला भारतात पाठवून दिले. आम्हाला जे हवे होते ते मिळाले आता तुझी गरज नाही असे सांगत त्यांनी आपला विखारी हेतू स्पष्ट केला.

भारतात आल्यावर तिने कोर्टात दावे दाखल करून कायदेशीर लढाई सुरू केली. त्यात तिला यशही आले. मुलाचा ताबा आईकडे देण्यात यावा असा निकाल कोर्टाने दिला मात्र इंग्लंडमध्ये असलेल्या ऋषिकेशने सर्व निकाल धुडकावले असल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला असून आपल्या अजाण बालकाचा ताबा कसा मिळणार या विवंचनेत ती अभागी माता आहे.

मुळचा नाशिक येथील ऋषिकेश सुरेंद्र कर्डिले हा लंडन अँड पार्टनर या कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मेनेजर या पदावर कामाला असून नाशिकच्या जेल रोडवर एमएसइबी कॉलनीत आजही ऋषिकेशची आई सुरेखा, वडील सुरेंद्र कर्डिले राहतात तर बहिण मृणालिनी कौशिक देशपांडे ही सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. तर आई नाशिकच्या प्रख्यात आदर्श विद्यालयात मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाली आहे. एवढी शिक्षित परिवार देखील असे करू शकतो यावर माचा देखील विश्वास बसत नाही असं अनामिका आणि तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे.

शेवटी 18 जानेवारी 2016 रोजी ऋषीकेशवर नॉन बेलेबल वारंट बजावण्यात आले आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट 2015 रोजी ठाणे फमिली कोर्टाने अनामिकाचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. असून दर महा 20 हजार रुपये ,तसंच मुलाचा ताबा तत्काळ आईकडे द्यावा असे आदेश ऋषिकेशला दिले आहेत. तर जेएमएफसी कोर्टाने सुजाताला राहाण्याचा खर्च 20 हजार दर महिना आणि पोटगी 20 हजार दर महा द्यावेत असे आदेश 3 नोव्हेंबर 2015 रोजी दिले आहेत. हताश झालेल्या अनामिका च्या पित्याने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले असून न्यायाच्या प्रतिक्षेत ते आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Manish Jape

    feels like IBN LOKMAT has already given judgement on the case. I could not read anywhere what is the investigation reporters did. Nowhere it is mentioned that they talked to the Hrishikesh. Biggest problem is, IBN Lokmat has kept “her” name hidden and “his” name is exposed thru this story.
    IBN lokmat as well as whole society has to not come to judgement on these kind of cases just becoz appealing person is “woman”

close