मृत्यू आणि साहसाची झुंज संपली, वीर जवान हणमंथप्पा शहीद

February 11, 2016 1:34 PM0 commentsViews:

नवी दिल्ली – 11 फेब्रुवारी : सियाचीनच्या युद्धभूमीत 19,500 फूट उंचावर, 25 फूट बर्फाखाली 6 दिवस मृत्यूशी झुंज देऊन वीरजवान हणमंथप्पा कोप्पाद यांनी साहस आणि धैर्याचं अनोख उदाहरण जगासमोर मांडलं. पण, काळाने त्यांचा पाठलाग काही सोडला नाही. गेली तीन दिवस मृत्यूशी सुरू असलेली त्यांची दुसरी झुंज अखेर अपयशी ठरलीये. वीरजवान हणमंथप्पा कोप्पाद यांचं निधन झालंय. उपचारादरम्यान 11.45 वाजता या वीरजवानाची प्राणज्योत मालवली. हणमंथप्पांच्या प्रकृतीसाठी देशभरात प्रार्थना केली जात होती. आता त्यांच्या दुख:द निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

LanceNaikHanamanthappaDies_53

देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणं काय असतं हे हणमंथप्पा कोप्पाद या वीरजवानाने दाखवून दिलं. एकीकडे शत्रू आणि दुसरीकडे निसर्ग अशी कडवी झुंज देऊन या वीरजवानाने मृत्यूलाही चकावा दिला. मागील आठवड्यात सियाचीनमध्ये जोरदार हिमस्खलन झाल्यामुळे पहारा देणारे 10 जवान ढिगाराखाली गाडले गेले होते. 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेरीस बेपत्ता झालेले 10 जवान शहीद झाल्याचं जाहीर करावं लागलं. पण, दुसर्‍या दिवशी शोधमोहिमेत हणमंथप्पा 25 फूट बर्फाखाली जिवंत सापडले. त्यांचा जिवंत राहणं हा एक मोठा चमत्कार होता. अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणात हणमंथप्पांनी मृत्यूशी झुंज देऊन विजय मिळवला होता. पण, सहा दिवस बर्फाखाली लढा देत असतांना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तातडीने दिल्लीतील आर्मीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या साहसाने अख्खा देश भारावून गेला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या वीरजवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हणमंथप्पा कोमात गेले होते. त्यांना न्युमोनिया झाला होता आणि दोन्ही फुफ्फ्सुसांमध्ये संसर्ग झाला होता. तसंच यकृत आणि एक किडनीही निकामी झाली होती. मेंदुला ऑक्सिजनचा पुरवठाही होत नसल्यामुळे आज त्यांची प्रकृती खालावली. सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी या वीरजवानाने अखेरच श्वास घेत जगाचा निरोप घेतला. हणमंथप्पा यांच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांनी गेली तीन दिवस शर्थीने प्रयत्न केले. पण, त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. मृत्यू आणि साहसाची अशी ही लढाई संपली…वीर जवान हणमंथप्पा कोप्पाद शहीद झाले.

हणमंथप्पा यांच्या प्रकृत्तीसाठी देशभरात लहाण्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्व जण प्रार्थना करत होते. गंगेचा घाट असो किंवा नाशिकचं रामकुंड…राममंदिर असो अथवा मस्जिद सर्व ठिकाणी वीरजवानाच्या प्रकृत्तीसाठी प्रार्थना केली जात होती. हणमंथप्पांच्या मुळगावीही चिंतातूर वातावरण होते. सर्व गावकरी ते सुखरुप परततील या आशेनं नजर लावून होते. पण, अखेर काळाजाचा ठोका चुकाला. हणमंथप्पा यांचं निधन झाला. चिंतातूर असलेलं वातावरण शोकाकुल झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close