बचतगटातून गरूडझेप

March 8, 2010 1:20 PM0 commentsViews: 27

नितीन चौधरी, पुणेबचत गटांमुळे गावोगावच्या महिलांना बळ दिले आहे. यामुळे अनेक निरक्षर महिला स्वत:च्या हिंमतीवर उभ्या राहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कमल परदेशी त्यापैकीच एक. घरी मसाले करून विकणार्‍या कमलताई आता चक्क 7 कोटींची मोठी कंपनी स्थापन करत आहेत. छोट्या झोपडीत राहणार्‍या निरक्षर कमलताईंनी महिलांना एकत्र करून अंबिका बचतगट स्थापन केला. आणि मसाले तयार करून विकण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला त्यांना पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मसाल्याच्या चवीविषयी खात्री होती. त्यामुळेच त्यांनी मोठी झेप घ्यायचे मनाशी पक्क केले. एक वर्षापूर्वी त्याना 'बिग बझार'चे कॉन्ट्रक्ट मिळाले. महिन्याला दीड टन मसाला 'बिग बझार' खरेदी करू लागले. मोठ्या कंपन्यांच्या जोडीने आपला मसाला विकला जातो, हे पाहून कमलाताई हरखून गेल्या.कमलाताईंच्या सोबत होत्या अनेकजणी. बांधावर मोल मजुरी करण्यापेक्षा आपल्या हक्काची भाकरी मिळवून देण्यासाठी कमलाताईंनी त्यांना उभारी दिली.सध्या त्यांच्याअंबिका बचतगटात 13 सभासद आहेत. जवळपास 30 प्रकारचे मसाले त्यांचा बचतगट तयार करतो. आता याच बचतगटाची एक मोठी कंपनी तयार होत आहे. त्यात 102 महिला असतील. 7 कोटींच्या या प्रकल्पाला केंद्रीय अन्न आणि प्रक्रिया मंत्रालयाने पाठबळ दिले आहे. केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर कमलताईंनी ही भरारी मारली आहे.

close