लढा पुरुषसत्तेशी…

March 8, 2010 1:31 PM0 commentsViews: 6

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्गआरक्षणाच्या नियमाने गावच्या सरपंचपदी महिला बसली असली, तरी खरा कारभार पुरूषच करत असल्याचे गावोगावचे चित्र आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवपूर गावच्या सरपंच महिलेने या पुरुषसत्तेच्या विरोधात लढा देऊन आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. अविश्वासाच्या ठरावाविरोधात लढून या महिलेने आपले पद कायम राखले आहे. शिवापूर गावच्या प्राजक्ता पांडुरंग राऊळ या सरपंचांची ही कहाणी आहे. हे गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाशी. वस्ती हजार बाराशेच्या आसपास.बारावीपर्यंत शिकलेल्या प्राजक्ता यांनी गावच्या विकासासाठी निवडणूक लढवली. आणि त्या गावच्या पहिल्या महिला सरपंच झाल्या. पण एका महिलेकडे गावच्या कारभाराची सूत्रे देणे अनेकांना रुचले नाही. आणि त्यांच्याच पक्षातील पुरुष सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. हा ठराव 5 विरुध्द 2 मतांनी मंजूरही झाला.पण हार न मानता प्राजक्ता यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांचा अभ्यास करुन थेट कोर्टात धाव घेतली. आणि आपले पद कायम राखले… त्यानंतर त्यांनी कामाचा धडाकाच सुरू केला. पुरुष सरपंच असलेल्या या गावात ग्रामसभाही फक्त कागदावरच होत होत्या. प्राजक्ता यांनी या ग्रामसभा सुरु केल्या. सरकारी योजनांची माहिती घराघरांत पोहोचवली. बचतगटांना चालना दिली आणि आता त्यांनी गावात नळयोजनाही सुरु केली आहे.अखेर गावकर्‍यांनी त्यांची ही कार्यक्षमता मान्य केली. प्राजक्ता यांना या लढ्यासाठी प्रेरणा मिळाली महिला राजसत्ता आंदोलनाची. आता गावकर्‍यांनाही पुढील पाच वर्षांसाठी याच सरपंचबाई हव्या आहेत.

close