वीरजवानाला अखेरचा सलाम

February 12, 2016 2:22 PM0 commentsViews:

hanmunthapa_hubli322हुबळी – 12 फेब्रुवारी : ‘अमर रहे,अमर रहे हणमंथप्पा अमर रहे, भारत माता की जय’, च्या घोषणा देत वीरजवान हणमंथप्पा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. हणमंथप्पा यांच्यावर त्यांच्या मुळगावी हुबळीतील बेटदूर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरजवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. मृत्यूला चकवा देणार्‍या या वीरजवानाला निरोप देताना बेटदूरकरांना अश्रू अनावर झाले.

सियाचीनमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे भारतीय सैन्याचे 10 जवान 25 फूट बर्फाचा ढिगाखाली अडकले गेले होते. यापैकी 9 जवान शहीद झाले. पण, हणमंथप्पा यांनी मृत्यूशी झुंज देत विजय मिळवला होता. सहा दिवस हणमंथप्पा 25 फूट बर्फाखाली जिवंत सापडले होते. त्यांना तातडीने दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 6 दिवस बर्फाखाली राहिल्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक आणि चिंताजनक होती. त्यांना न्युमोनिया झाला होता. आणि फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. तिथेही त्यांनी मृत्यूशी दुसरी झुंज दिली. तीन दिवस डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि या वीरजवानाने जगाचा अखेरचा निरोप घेतला. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. गुरुवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव दिल्लीत ब्रार स्क्वेअरमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तेथून रात्री त्यांचं पार्थिव त्यांच्या जन्मभूमीत हुबळीत आणण्यात आलं. आज सकाळी अंत्यदर्शनासाठी बेटदूरमध्ये अलोट असा जनसागर लोटला होता. ‘हणमंथप्पा अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत व्यापून गेले होते. शोकाकुल अशा वातावरणात लष्काराच्या जवानांनी आपल्या या सहकार्‍याला सलामी दिली. बेटदूरच्या या वीरपुत्राला निरोप देताना त्यांच्या कुटुंबियासह बेटदूरकरांना अश्रू अनावर झाले. सियाचीन सारख्या युद्धभूमीत मृत्यूलाही चकावा देणार्‍या अशा या वीरजवानाला सलाम…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close