सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

February 12, 2016 8:54 PM0 commentsViews:

विवेक कुलकर्णी, मुंबई

सावकारी कर्जातून शेतकर्‍यांची मुक्तता करु अशी राज्य सरकारनं घोषणा केली खरी पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 5 लाख शेतकर्‍यांची सावकारी पाशातून मुक्तता करू असं सरकारनं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात 31 हजार शेतकरीच लाभार्थी ठरले आहेत, असं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे.

Drought_eps

सावकारी कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं 2014च्या हिवाळी अधिवेशनात 373 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात मात्र फक्त 46 कोटीच रक्कम मंजूर झाली असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना आरटीआयच्या अंतर्गत जी माहिती मिळाली त्यात आढळून आलं आहे. राज्यात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांपैकी 40 ते 45 टक्के आत्महत्या सावकरांच्या कर्जामुळे होतात असं म्हणत सरकारनं कर्जमाफी जाहीर केली होती पण प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

सावकार कर्जमाफी : फक्त आश्वासनच?
– पहिला प्रस्ताव (सहकार विभाग) : 604 कोटी
– कर्जमाफीची घोषणा: 373 कोटी
– मंजूर रक्कम: 46.66 कोटी
– कर्जग्रस्त शेतकरी: 5,84,536
– लाभार्थी शेतकरी: 31,000

विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. ज्या सावकारांना शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यात आली ते सगळे भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांच्या जवळचे आहेत असा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

अस्मानी आणि सावकारी कर्जाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना एकमेव आशा आहे ती म्हणजे सरकारी मदतीची, पण सरकारच मदत करणार नसेल तर तरी आपण पाहायचं तरी कोणाकडे हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close