रिक्षाचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

February 15, 2016 11:32 AM0 commentsViews:

rickshaw_strike

मुंबई – 15 फेब्रुवारी : मुंबईतील रिक्षाचालक यांच्या विविध मागण्यांसाठी ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स’ या संघटनेने आज (सोमवारी) संप पुकारल्याने मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही मार्गांवर बेस्टने जादा बस सोडल्या असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

घाटकोपर, भांडूप, कांजुरमार्ग इथे सर्व रिक्षा बंद आहेत, तर वांद्रेमध्ये कमी संख्येने रिक्षा रस्त्यावर दिसत आहेत. काही रिक्षाचालकांनी सकाळी आपल्या रिक्षा रस्त्यावर उतरवल्या होत्या. पण युनियनच्या कार्यकर्त्यांनी धमक्या देऊन त्या बंद करायला लावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मुंबईतल्या तब्बल 83 हजार रिक्षाचालक संपात सहभागी असल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.

खासगी रिक्षा-टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी त्यांच्यासाठी नियमावली तयार करावी, ही प्रमुख मागणी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केली होती. मात्र, परिवहन विभाग आणि परिवहनमंत्री यांनी आश्वासने देऊनही याबाबत कोणतेही ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळे संघटनेने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण सरकार आणि रिक्षाचालकांच्या या वादात चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close