‘मेक इन इंडिया’ म्हणजे फक्त शोबाजी – राज ठाकरे

February 17, 2016 2:24 PM0 commentsViews:

raj thackaey pc

मुंबई – 17 फेब्रुवारी :  स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी परदेशातील उद्योजकांना इथे बोलवायची गरज काय? उद्योग वाढवायचेच असतील तर मग इव्हेंट्सचा शोबाजी कशाला? असं प्रश्न उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर सडकून टीका केली. मुंबईत आज (बुधवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मेक इन इंडिया’च्या लोगोसाठी सिंहच का? नरेंद्र मोदींच्या डोक्यातून गुजरात अजूनही गेलेला नाही हे यामधून सिद्ध होते. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ‘व्हायब्रंट गुजरात’सारख्या कल्पना राबवल्या गेल्या. हजारो कोटींची गुंतवणूक झाल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या पण प्रत्यक्षात गुजरातमध्ये उद्योगांची भरभराट झाल्याचं काही दिसून आले नाही. ‘मेक इन इंडिया’चीही तीच गत आहे. उद्योग आणायचेच असतील तर थेट उद्योगपतींना गाठून करार करा, त्यासाठी इव्हेंटबाजी कशाला हवी? असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी जेएनयूच्या वादवरूनही केंद्र कडाकडून हल्ला चढवला. जेएनयू प्रकरणात ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. त्यांना सरळ फोडून काढा. त्यात राजकारण कसले करता? भाजपाने देशभक्तीचे सर्टिफिकेट देण्याचे काम करू नये. भाजपाची विद्यार्थी संघटना जेएनयूमध्ये घुसवण्यासाठी हे होत असेल, तर हे घाणेरडे राजकारण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

तसंच विद्यापीठाच्या राजकारणात राहुल गांधी यांनी पडण्याची गरज नव्हती. पोलीस काय ते बघून घेतील. विद्यापीठाचा विषय देशपातळीवर उभा करून राजकारण करू नका. देशाचे राजकारण करण्याऐवजी विद्यापीठाचे राजकारण कसले करता, असं म्हणत राज यांनी राहुल यांच्यासह भाजपाला टोला लगावला. तर राज्यातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णयावरून राज यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सरकार चारा छावण्या बंद करण्याच निर्णय घेते आणि हा निर्णय अंगलट आला की निर्णय मागे घेतला जातो. मग निर्णय घेण्याआधी यांना अक्कल नव्हती का?, असा सवाल करत राज यांनी राज्य शासनावरही हल्ला चढवला.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची नेमकी भूमिका अद्यापही कळालेली नाही. सत्तेत राहून मंत्रिपदं आणि फायदे मिळवायचे आणि विरोधाचीही भूमिका घ्यायची ही कुठली भूमिका? विरोधी करण्यापेक्षा प्रश्न सोडवा, अशा शब्दांत राज यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close