‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून राज्यात 8 लाख कोटींचे करार

February 18, 2016 9:51 AM0 commentsViews:

make in India new211

मुंबई – 17 फेब्रुवारी :  मेक इन इंडिया ही परिषदेत राज्यासाठी फायद्याची ठरली आहे. मेक इन इंडिया सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, परवडणारी घरं या सारख्या 18 क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांद्वारे आतापर्यंत राज्यात 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मेक इन इंडिया सप्ताहाला आजचा शेवटचा दिवस असून आणखी काही करार होण्याची शक्यता आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना डिझाईनच्या दृष्टीने सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने काल ऑटोडेस्कसोबत 412 कोटी रूपयांचा करार केला. यातून 11 लाख उद्योजक लाभान्वित होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच, पहिल्यांदाच 11 गावांनी 3550 हेक्टर जागा लँड पुलिंगच्या माध्यमातून खालापूर स्मार्ट सिटीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या नैना प्रकल्पात हे शहर तयार होणार आहे. सिडकोने सुद्धा नैना प्रकल्पाच्या विकासासाठी 11 सामंजस्य करार केले. 37861 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे हे करार आहेत. त्याचबरोबर, सिडकोच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलसोबत करार केला. तर, एमसीएचआय-क्रेडाई यांनी 5, 69 हजार परवडणारी घरे बांधण्यासाठी 1.10 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक प्रस्तावित केली. यातून 7,65 हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

केंद्र शासनाने किरकोळ व्यापार धोरण जाहीर केल्यानंतर राज्यामध्ये या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा विविध कंपन्यांबरोबर आज सामंजस्य करार झाला. यामध्ये फ्युचर ग्रुप (८५० कोटी रुपये), ट्रेन्ट हायपरमार्केट (४०० कोटी), डी मार्ट (२५० कोटी), मेजर ब्रँडल (५० करोड), मेट्रो शूज (५० करोड), शॉपर्स स्टॉप (३० करोड) या कंपन्यांचा समावेश आहे.

याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल आणखी काही सामंजस्य करार करण्यात आले आहे. भिवंडीमध्ये एकात्मिक औद्योगिक टाऊनशीलसाठी रेनेसा इंडस इन्फ्रा प्रा. लि. यांनी 8569.58 कोटीची गुंतवणूक करण्याचे ठरवलं असून यातून 82,126 रोजगार निर्माण होणार आहेत. लिनन आर्ट 535 कोटी रूपये तारापूर येथे लिनन उत्पादनासाठी गुंतवणार असून, त्यातून 3 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. जेएनपीटीनजीक सुमेरू बायो-डिझेल प्रकल्पासाठी 100 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून 200 रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. मिहान प्रकल्पात जागतिक दर्जाचा लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सनटेक रियॅलिटीने 1500 कोटी गुंतवणूक करण्याचे निश्चित केले.  पहिल्या एअर ऍम्ब्युलन्ससाठी मॅब एव्हिएशनने आज मेक इन इंडिया सेंटर येथे सामंजस्य करार केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close