झरीकरांची दुष्काळावर मात,पाण्यासाठी वणवण थांबली

February 18, 2016 5:10 PM0 commentsViews:

पंकज क्षीरसागर, परभणी -18 फेब्रुवारी : दुष्काळ हा परभणी जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलाय. पण त्यातूनही मार्ग काढायला हवा…परभणीतल्या झरी गावच्या ग्रामस्थांनी कशी दुष्काळावर मात केलीये. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट…

parbhani3परभणीपासून 16 किमी अंतरावर 17 हजार लोकसंख्येचं झरी हे गाव. 6 महिन्यांपूर्वी हे गाव पाण्यासाठी व्याकूळ झालं होतं. भूजल पातळी खालावल्यानं पुढं काय हा प्रश्न आ वासून उभा होता. पण, गावातले जेष्ठ नागरिक कांतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. गावाशेजारच्या लेंडी ओढ्याच्या पुनरुजीवनाचा प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानातून हाती घेतला आणि लोकसहभागातून 38 लाख रुपये जमले. त्यातून 2 जेसीबी, 22 टिप्पर आणि 6 ट्रॅक्टरद्वारे 9 बंधारे तयार केले. खोलीकरण करत 6 किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झालं. आणखी 29 किलोमीटर काम सुरू आहे. सध्या या ओढ्यात पाणी साचलंय. साहजिकच झरीकर सुखावलेत.

नाम फाउंडेशननं झरी गाव दत्तक घेतलंय. त्यामुळे या लेंडी ओढ्याला गावकर्‍यांनी नाम नदी हे नाव दिलं. जलसंधारणाच्या कामांमुळे हा परिसर अगदी हिरवागार झालाय. शेतकर्‍यांनी गहु,हरभरा,आदी पिकांसह फळबागाही लावल्यात. गावातल्या 250 बोअर आणि 100 विहिरींना पाणी आलंय. त्यामुळे गावातल्या एकाही महिलेला पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही.

गावाच्या भल्यासाठी असलेल्या योजना राबवण्यासाठी जर गाव एकत्र आलं तर काय क्रांती होऊ शकते हे झरी गावानं दाखवून दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close