मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक सुरू

February 19, 2016 9:32 AM0 commentsViews:

Jumbo Block213

मुंबई -19 फेब्रुवारी : हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या गाडय़ा चालाव्यात यासाठी सीएसटी इथे आज (शुक्रवारी) सकाळपासून 72 तासांचा जम्बोब्लॉक सुरू झाला आहे. आज या विशेष ब्लॉकचा मोठा फटका बसणार नसला तरी उद्या आणि परवा पूर्ण वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस हार्बरकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

शनिवार-रविवार पूर्ण दिवस आणि सोमवारी ब्लॉक संपेपर्यंत हार्बर मार्गावरील गाडय़ा वडाळा ते सीएसटी यांदरम्यान पूर्णपणे बंद राहतील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी रविवारी मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक न घेता गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. वडाळा ते वाशी आणि वडाळा ते पनवेल ही वाहतूक नेहमीसारखी सुरू आहे. या दरम्यान हार्बरच्या प्रवाशांना मेन लाईनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बरवर टप्याटप्याने 12 डबा लोकल चालवण्यात येणार आहे. त्यासाठी जून उजाडणार आहे. ‘मरे’च्या नियोजनानुसार हार्बरवर डीसी-एसी परिवर्तन आणि 12 डब्यांच्या गाड्यांचे प्रकल्प एकाच वेळी सुरू करण्याचा मानस होता. मात्र लोकलच्या कमतरतेमुळे प्रथम डीसी-एसी परिवर्तन केलं जाणार आहे. डीसी-एसीचं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.

– आज सीएसटी स्थानकात हार्बर मार्गाचा एकच प्लॅटफॉर्म कार्यरत
– शनिवारी आणि रविवारी वडाळा ते सीएसटी वाहतूक बंद
– हार्बरच्या प्रवाशांना ठाणे आणि कुर्ल्यामार्गे जाण्याची परवानगी
– 12 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी जम्बोब्लॉक
– सध्या हार्बर मार्गावर 9 डब्यांच्या गाड्या
– प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close