‘महाराष्ट्रातील सर्व गोष्टींचे मराठीकरण करायचे आहे’

March 10, 2010 12:26 PM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींप्रमाणेच अस्मिता आहे…अस्मिताच तुमची ओळख असते…आणि या अस्मितेबाबतच सर्व मराठी जनतेच्या मनात नैराश्य आले होते…आणि म्हणूनच मला आता महाराष्ट्रातील सर्व गोष्टींचे मराठीकरण करून घ्यायचे आहे…हा निश्चय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. आणि त्यांनी तो व्यक्त केला आहे, 'आयबीएन-लोकमत'च्या माध्यमातून. कालच मनसेने आपला चौथा वर्धापनदिन साजरा केला. त्यानिमित्ताने 'आयबीएन-लोकमत'च्या फिचर्स एडिटर ज्ञानदा यांनी राज ठाकरे यांच्याशी बातचीत केली. यावेळी मराठी मन आणि मराठी अस्मिता तसेच मनसेच्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांनी 'मनसे' मते मांडली. महिला आरक्षण विधेयकाबद्दल मनसेने दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले. आपण मराठीतून दलित, मुसलमान असे बाजूला करत नाही हे सांगताना 'दलित', 'मुस्लिम बांधव' अशी संबोधने वापरणे मला पटत नाही. हे सगळे महाराष्ट्रातीलच मराठी लोक आहेत, असे राज म्हणाले.मी कोणत्याही प्रकारचा कायदा मोडलेला नाही, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, माझे मुद्दे मी कायदा न मोडता कायद्याच्या चौकटीतच मांडले आहेत. पण जे कायदा पाळत नाहीत, त्यांच्याबद्दल बोलल्यावर मी कायदा मोडला, असे कसे म्हटले जाते, हेच मला पटत नाही. मी कायदा मोडतो, कायदा हातात घेतो अशी चर्चा होते…मग त्यापेक्षा कायदा, सरकारच माझ्या हातात द्या ना…मग चिंताच मिटली सगळ्या गोष्टींची…अशी विविध मुद्द्यांवर चौफेर टोलेबाजीही राज यांनी या मुलाखतीत केली.राज ठाकरे यांची ही मुलाखत 'आयबीएन-लोकमत'च्या प्रेक्षकांना आज रात्री साडेआठ वाजता पाहता येईल.

close