स्मारक उभारण्यापेक्षा गडकिल्ले वाचवा – राज ठाकरे

February 21, 2016 5:32 PM0 commentsViews:

raj thackray21

पुणे – 21 फेब्रुवारी :  राज्यात गड किल्ल्यांची दुरवस्था झाली असताना, त्यांचं संवर्धन करण्याऐवजी अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक का उभारायचं, असा सवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) उपस्थित केला आहे. तसंच महाराज्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा गड किल्ल्यांना जपा, तीच शिवाजी महाराजांची खरी स्मारके आहेत, असं आवाहन ते म्हणाले.

गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि एम. के. महाजन यांचा राज ठाकरे यांच्याहस्ते ‘गार्डियन गिरीप्रेमी जीवनगौरव पुरस्कारा’नं आज सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारायला पुन्हा एकदा विरोध केला. स्मारकांच्या नावाखाली आपल्याकडे निसर्गसंपन्न जागा बळकावल्या जातात, आणि पुतळे उभारण्याचं काम केलं जातं अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

त्याचबरोबर, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गिर्यारोहकांनी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पारदर्शकतेने इतिहास मांडला. शिवाजी या 3 अक्षरासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना राजकारण कसं काय करता, असा जळजळीत सवाल ठाकरे यांनी पुरंदरे विरोधकांना केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close