अंबाबाईचा लाडूचा प्रसाद कैदी तयार करणार, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

February 24, 2016 7:02 PM0 commentsViews:

कोल्हापूर – 24 फेब्रुवारी : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आता लाडू प्रसादावरुन पुन्हा एकदा वाद सुरू झालाय. प्रसादाचा लाडू महिला कैदीकडून बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. कैदी महिलांनी लाडू तयार केला तर त्याचं पावित्र्य राहणार नाही अशी वकिली करत हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध सुरू केलाय.mahalaxmi_prsad

कोल्हापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज मंदिरात येत असतात. त्यांना प्रसाद म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 5 रुपयांमध्ये लाडूचा प्रसाद दिला जातो. पण देवस्थान समितीसमोर अध्यक्ष म्हणजेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांनी हाच लाडूचा प्रसाद महिला कैद्यांकडून तयार करुन घेण्याचा प्रस्ताव ठेवलाय. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये सध्या 70 महिला कैदी आहेत. याच महिलांना देवस्थान समिती साहित्य पुरवणार असून त्यांच्याकडून लाडूचा प्रसाद बनवून घेणार असल्याची माहिती आयबीएन लोकमतला सूत्रांनी दिलीय.

जरी हा प्रस्ताव विचाराधीन असला तरी या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. कैदी महिलांनी प्रसाद केल्यामुळे त्याप्रसादाचं पावित्र्य जपलं जाणार नाही असा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केलाय. यापूर्वीही याच लाडू प्रसादाबाबत ठेकेदाराकडून योग्य पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता याच प्रकरणावरुन प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात हा वाद सुरू झालाय. पण काही भक्तांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close