महिला पोलिसाला मारहाण करणारा नराधम कॅमेर्‍यात कैद

February 26, 2016 7:28 PM0 commentsViews:

ठाणे – 26 फेब्रुवारी : सत्ता कशी डोक्यात जाते याचं एक उदाहारण काल ठाण्यात पाहायला मिळालंय. मोबाईलवर बोलताना पकडलं म्हणून शशिकांत कालगुडे या नराधमाने महिला पोलीस कर्मचार्‍याला भररस्त्यावर मारहाण केली या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी कालगुडेला जामीन मंजूर झाला आहे. पण, जामिनावर सुटल्यानंतर कालगुडेला ठाणे एसीपींच्या विशेष अधिकारात तुरूंगात पाठवलं आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्याला तुरूंगात ठेवलं जाणार आहे.

thane_shivsenekठाण्याच्या तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात राहणारा आरोपी शशिकांत गणपत कालगुडे (44) गुरुवारी सकाळी नितीन कंपनी जंक्शन येथून ‘स्कॉपिओ’ गाडीने जात होता. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणार्‍या शशिकांत याला नितीन कंपनी जंक्शन येथे कर्तव्यावर असणार्‍या पोलीस शिपाई महिलेने हटकले. त्यामुळे सिग्नलवर वाहनांचा खोळंबा होत असल्याचे शशिकांतच्या निदर्शनास आणून देताच रागाचा पारा चढल्याने त्याने गाडीतून उतरत पोलीस शिपाई महिलेला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

दुदैर्वाची बाब म्हणजे, महिलेची कॉलर पकडून तिला धक्काबुक्की करणार्‍या शशिकांतला कोणीही रोखण्यास पुढे येत नसताना काही सुजन नागरिकांनी त्याला रोखले आणि पीडित शिपाई आणि नराधम शशिकांतला घेऊन नौपाडा पोलीस ठाणे गाठलं. महिला शिपाईने नाकातून रक्तस्त्राव होत असताना देखील मोठ्या धैर्याने गुन्हा दाखल केला.

नौपाडा पोलिसांनी शशिकांतवर कलम 353 आणि 354 अन्वये गुन्हा दाखल करून अटल केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज त्याची जामिनावर सुटका झाली. पण ठाणे एसीपींच्या विशेष अधिकारात तुरूंगात पाठवलं आहे. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल केलाय.

शिवसेना म्हणते, पक्षाला यात खेचू नका !

परंतु, शिवसेनेनं या प्रकरणी हात झटकले आहे. सेनेनं या प्रकरणावर एक पत्रक काढलंय. काडगुडे आमचा पदाधिकारी नाहीये. जे झालं ते वाईट आणि निंदनीयच होतं त्या कृत्याचा पुरस्कार शिवसेना करत नाही. पक्षाला यात खेचू नका. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे, असं या पत्रात म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close