हे बजेट गरिबांचं आणि शेतकर्‍यांचं, मोदींनी केलं जेटलींचं कौतुक

February 29, 2016 6:32 PM0 commentsViews:

modi_sot34329 फेब्रुवारी : हे बजेट गरिबांचं आणि शेतकर्‍यांचं आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं कौतुक केलं. या बजेटमध्ये सर्व वर्गांचा विचार केला गेलाय असंही मोदी म्हणाले.

सर्वसमावेशक बजेट सादर केल्याबद्दल पंतप्रधानांनी जेटली यांचं अभिनंदन केलं. गावं, गरीब, शेतकरी आणि महिलांचा या बजेटमध्ये विचार केला गेलाय. हे बजेट गरिबीपासून मुक्त करणार्‍या योजना देत आहे. यामध्ये यासाठी पाऊलं उचलली गेली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही महत्त्वपूर्ण आहे. शेतापर्यंत सिंचनाचं पाणी पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. 2019 पर्यंत देशातील प्रत्येक गावाला रस्त्यांशी जोडण्याचा संकल्प केला गेला हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातही विद्युतिकरणासाठी भरीव तरतूद केली गेली आहे. जर एखाद्या गरिबाला घर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलं आहे हे चांगले निर्णय आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणे हे अत्यंत जिकरीचं काम आहे. यासाठी दीड कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला विमा देण्याचाही निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आलाय. आमचं सरकार नेहमी देशातील जनतेच्या सोबत आहे आणि आजचं हे बजेट भारतीयांचं स्वप्न पूर्ण करू शकतं असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close