मनसेची उमेदवार परीक्षा

March 12, 2010 1:27 PM0 commentsViews: 1

विनय म्हात्रे, विनोद तळेकर, मुंबई12 मार्च नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची तयारी जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उमेदवारांच्या परीक्षेचा मुद्दा मांडला होता. ही परीक्षा सुरू झालीये आणि त्याचा निकाल गुढीपाडव्याला लागणार आहे. राज ठाकरेंनी केलेल्या परीक्षेच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त खळबळ माजली. राज ठाकरेंचे हे विधान म्हणजे तिकीटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना हादरा होता. आजपर्यंत कार्यकर्त्यांचे कर्तृत्व हे त्यांच्या राजकीय उपद्रव मुल्यावर आणि पक्ष नेतृत्वाशी असलेल्या संबंधांवर ठरत होते. ज्याचे उपद्रवमूल्य जास्त आणि ज्याच्यावर वरिष्ठांची मेहेरनजर, त्याचे तिकीट पक्के असे एकूण गणित होते. त्यामुळे हे परीक्षा प्रकरण नेते आणि कार्यकर्त्यांसाठी एकूणच अवघड जागेचे दुखणे झाले आहे.नवी मुंबईसाठी स्वत: राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांची एक बैठक घेतली. त्यात 8 जणांची एक समिती नवी मुंबईच्या निवड प्रक्रियेसाठी तयार करण्यात आली आणि दोन प्रश्नपत्रिकाही…परिक्षेच्या पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवाराला त्याच्या प्रभागाबद्दल काही जुजबी प्रश्न विचारण्यात येणार आहेत…जसे प्रभागातील नागरी प्रश्न कोणते, विभागात पक्षातर्फे तुम्ही सोडवलेले प्रश्न, पक्षाच्या आंदोलनात कधी आरोपपत्र दाखल झाले आहे का, अपेक्षित मतदान किती होण्याची शक्यता आहे…तर दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपात असेल.. यात महापालिकांशी संबंधित कामे, नगरसेवकांची कर्तव्येआणि अधिकार, बजेटबद्दलची माहिती, नियम आणि अधिनियम याबाबतचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याची तर काळजी घ्यावी लागणारच आहे. पण त्यापूर्वी पक्षाच्या या परीक्षांमध्येसुद्धा उत्तम मार्क मिळवावे लागणार आहेत.

close