‘पीपीएफ’वर टॅक्स लागणार नाही – केंद्र सरकार

March 1, 2016 9:39 PM0 commentsViews:

EPF Banner211

01 मार्च :  पीएफच्या निधीतून काढण्यात येणार्‍या रकमेवर कर लावण्याच्या निर्णयामुळं निर्माण झालेल्या गोंधळावर केंद्र सरकारनं आज स्पष्टीकरण दिलं. ‘पीपीएफमधून (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) काढण्यात येणार्‍या रकमेवर कोणताही टॅक्स लावला जाणार नाही. त्यावरील करसवलत पूर्वीप्रमाणेच सुरू राहील,’ असं सरकारनं म्हटलं आहे.

ईपीएफ (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी) आणि एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम)मधून 1 एप्रिल 2016 नंतर रक्कम काढल्यास 60% रकमेवर कर लावण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. जेटली यांच्या या घोषणेमुळं ईपीएफ, एनपीएस आणि पीपीएफ खातेधारकांमध्येही संभ्रमाचं वातावरण होतं. गुंतवणूकदारांच्या नाराजीची दखल घेऊन महसूल सचिव हसमुख अधिया यांनी याबाबत खुलासा केला आहे.

त्यामुळे आता, पीपीएफमधून काढण्यात येणार्‍या रकमेवर पूर्वीप्रमाणेच करसवलत कायम रहणार असून कर्मचार्‍यांनी ईपीएफमध्ये भरलेल्या रकमेवर कर लागणार नाही. ईपीएफमधून काढण्यात येणार्‍या एकूण रकमेवरील 60% व्याजावर कर भरावा लागेल. शिवाय, हा कर 1 एप्रिल 2016 नंतर जमा करण्यात आलेल्या रकमेवरील व्याजावरच लागेल. तसंच 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचार्‍यांच्या ईपीएफवर कर लागणार नाही. त्यांना या करातून वगळण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close