‘रात्रीस खेळ चाले’चे ‘खेळ’ बंद करा, शिवसेनेचं आंदोलन

March 2, 2016 1:40 PM0 commentsViews:

मुंबई – 02 मार्च : झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला कोकणापाठोपाठ आता मुंबईतही विरोध सुरू झाला आहे. ही मालिका बंद करण्यात यावी अशी मागणी करत शिवसेनेनं आंदोलन केलंय. तसंच आमची मागणी मान्य झाली नाहीतर शिवसेना आपल्या स्टाईलने हे आंदोलन करेल असा इशारा दिलाय.Ratris Khel Chale

‘कोकणातली भूतं लई वाईट, एकदा धरली ना सोडत नाय’ असं म्हणतं अवघ्या महाराष्ट्राच्या मनात भीती निर्माण करणार्‍या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेनं अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलीये. भूत, प्रेत, आत्मा आणि कोकण या भोवती ही मालिका सादर करण्यात आलीये. 22 फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू झाली. कोकणाचा संदर्भ आल्यामुळे काही संघटनांनी या मालिकेला विरोध घेतलाय. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी या मालिकेतून घातलं जात आहे असा आरोप होत आहे. या मालिकेचा कोकणाच्या पर्यटनावर परिणाम होईल असा आरोपही कोकणातील संघटनांनी केलाय.

या आंदोलनात आता शिवसेनेनं उडी घेतलीये. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला कोकणा पाठोपाठ आता मुंबईत ही विरोध सुरू झाला आहे. मुंबई शहरात कोकणी माणूस मोठ्या संख्येनं राहातो. त्यांच्या मते या मालिकेत अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होत आहे. शिवाय याचा दूरगामी परिणाम कोकणाच्या पर्यटनावर सुद्धा होईल म्हणून या मालिकेला बंद करा अशी मागणी आज मुंबईतल्या शिवसैनिकांनी केली.

त्यासाठी मागणीचा एक निवेदन झी वाहिनीला देण्यात आलं. याच इमारतीमध्ये इज्राईलचे दुतावास असल्याने आज फक्त निवेदन देत आहोत. पण, मालिकेत सुधारणा न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close