15 मार्चपूर्वी डान्सबार मालकांना परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

March 2, 2016 2:56 PM0 commentsViews:

mumbai_dance_bar_

मुंबई – 02 मार्च :  महाराष्ट्रातील डान्सबारसंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. येत्या 15 मार्चपर्यंत डान्सबार सुरू करण्याबाबत परवाने द्या, असं स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. तसंच डान्सबारच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना राज्य सरकारने डान्सबार चालकांना केली होती. तीही सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे.

सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2015मध्ये डान्सबार बंदीवरील हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर डान्सबार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, डान्सबार सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लादलेल्या 26 जाचक अटींविरोधात बार मालकांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत 15 मार्चपर्यंत डान्सबार सुरू करण्यासाठी परवाने देण्याचे आदेश देत कोर्टाने राज्य शासनाला पुन्हा चपराक लगावली आहे. त्याचबरोबर फक्त बारच्या प्रवेशद्वारासमोरच सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. डान्सबारच्या आतमध्ये सीसीटीव्ही लावण्याचं बंधन म्हणजे लोकांच्या खासगी जीवनावर अतिक्रमण करण्यासारखे असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close