मोदींची ‘फेअर अॅण्ड लव्हली’ योजना; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

March 2, 2016 6:55 PM0 commentsViews:

rahul-gandhi-lok-sabha-apr22_650x400_71429685785

नवी दिल्ली – 02 मार्च : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवारी) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणार्‍यांना तुरुंगात टाकणार असं सांगितलं होते. मात्र आता काळा पैसा गोरा करण्यासाठी मोदी सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारची खिल्ली उडवली.

लोकसभेत बोलताना राहुल गांधी आज आक्रमक झाले होते. त्यांनी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी एकट्याच्या मनाने देश चालवू शकत नाहीत. हा देश म्हणजे पंतप्रधान नव्हेत, आणि पंतप्रधान म्हणजे देश नाही, असा टोलाही राहुल गांधींनी मोदींना लगावला. त्याचबरोबर, महात्मा गांधीजी आमचे आणि सावरकर तुमचे आहेत, असं विधानही राहुल गांधी यांनी केलं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये गोंधळ झाला.

निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असं मोदी सांगतात, पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन म्हणतात की, “मनरेगा इतकी चांगली योजना नाही”. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.

जेएनयू वादाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारचं संपूर्ण भाषण ऐकलं. पण त्यात कुठेही तो देशविरोधी बोलल्याचं आढळून आलं नाही. तरीही भाजप सरकारनं त्याच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप ठेवत तुरुंगात टाकलं आहे, असं राहुल म्हणाले. जेएनयूमध्ये गरिब, दलित आणि अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असल्याने भाजप सरकार विद्यापीठाच्या ‘हात धुवून मागे’ लागले आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.

पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आलेत, असा आरोप राहुल यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close