मराठवाड्यात मंत्र्यांचा दुष्काळीदौरा; शेतकर्‍यांचा रोष

March 4, 2016 1:39 PM0 commentsViews:

Dushkal Daura

मराठवाडा – 04 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह राज्यातील 25 मंत्र्यांच्या मराठवाडय़ातील दुष्काळी दौर्‍याला आज (शुक्रवारी) सकाळपासून सुरुवात झाली. दुष्काळी स्थितीची पाहणी करणार्‍या या मंत्र्यांना शेतकर्‍यांच्या रोषाचाही सामना करावा लागला.

राज्यात यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळ आहे. मराठवाडय़ात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असून, तिथला जलसाठा 6 टक्क्यांपर्यंत खालावला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह जवळपास 25 मंत्री मराठवाडय़ाच्या दौर्‍यावर आहेत. प्रशासनानं पोहोचवलेल्या सर्व सुविधा आणि योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळतोय का? याचा आढावा घेण्यासाठी सर्व मंत्री मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत.

राज्यातील या सर्व 25 मंत्र्यांना तालुके नेमूने देण्यात आले असून, या मंत्र्यांनी त्या-त्या भागाची पाहणी केली. मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील गेवराई इथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. तिथल्या महिलांसोबत बैठकही घेतली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीडमधील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याबरोबरच लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत उपाय योजण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही लातूरमधील दुष्काळीभागाला भेट देत शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतली.

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी उस्मानाबादमधील येडशी इथल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली. ही पाहणी करत असताना त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तावडे यांच्या ताफ्यावर दूध फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवत नारेबाजी केली.

या मंत्र्यांच्या दुष्काळी दौर्‍यात जागोजोगी शेतकर्‍यांचा असंतोष प्रकट झाला. या सरकारला शेतकर्‍यांच्या संकटाची जाणीव नाही. दुष्काळग्रस्तांसाठी हे सरकार काय करत आहे, असा सवाल या वेळी करण्यात आला. पाणीटंचाई, चाराटंचाई याबाबत सरकार काय करीत आहे, अशी विचारणाही या दौर्‍यात शेतकर्‍यांकडून करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close