रस्त्यांच्या नावांची स्पर्धा

March 13, 2010 1:43 PM0 commentsViews: 9

विनय म्हात्रे, नवी मुंबई 13 मार्चनवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नगरसेवकांनी एकच सपाटा लावला होता. तो म्हणजे रस्त्यांच्या नामकरणाचा. आपली नगरसेवकपदाची मुदत संपण्याआधी जास्तीत जास्त रस्त्यांचे नामकरण त्यांना आपल्या नातेवाईकांच्या नावे करायचे होते. सध्या नवी शहरातील कोणताही रस्ता असो किंवा गल्ली सर्वत्र आपल्याला नावांच्या पाट्या दिसतील. आपल्याला वाटेल, या सर्वांचेच या शहरासाठी काहीतरी योगदान असेल. पण यांचे योगदान एवढेच की यांचा एक नातेवाईक नगरसेवक आहे! शाळेला सासर्‍यांचे नावयातून महापालिकेच्या शाळाही सुटलेल्या नाहीत. नवी मुंबईतील सर्वात जुनी शाळा असलेल्या मनिषा विद्यालयाच्या इमारतीची महापालिकेने नव्याने उभारणी केल्यावर शाळेला स्थानिक नगरसेविका स्नेहा पालकर यांच्या सासर्‍यांचे नाव देण्यात आले.महापलिकेच्या नियमावलीनुसार रस्त्याला किंवा वास्तूला एखाद्या व्यक्तीचे नाव द्यायचे असल्यास काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. पण नावांचा प्रस्ताव आणणारी आणि मंजूर करणारी मंडळीच हे सर्व करत असतात. त्यामुळे विरोध कोणी करायचा हा खरा प्रश्न आहे. सिडकोच्या निर्णयाकडे दुर्लक्ष नवी मुंबई शहर वसवल्यानंतर सिडकोने शहरातील रस्ते, चौक आणि वास्तूंना कोणत्याही व्यक्तींची नावे देण्याऐवजी निसर्गाला अनुसरुन नावे देण्याचा निर्णय घेतला होता. पण नगरसेवकांनी सिडकोच्या या धोरणालाच काळे फासले.एक्सप्रेस वे च्या धर्तीवर उभारण्यात आलेला नवी मुंबई शहरातला हा सर्वात महत्वाचा रस्ता म्हणजे पाम बीच रोड. सिडकोने इथे पामची झाडे लावली आहेत. अशाच प्रकारे शहरातील रस्ते, उद्यान, चौक यांना झाडे, फळे आणि फुलांची नावे देण्यात आली. पण नगरसेवकांनी ही संकल्पनाच धुळीला मिळवली.शहरातील रस्तेच काय पण शाळांनाही आपल्या नातेवाईकांची नावे देण्याची कामगिरी या नगरसेवकांनी बजावली आहे. आता अशा वृत्तीवरच आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

close