मुंबई, दिल्लीसह देशातल्या अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा

March 7, 2016 1:25 PM0 commentsViews:

mumbai-alert

नवी दिल्ली -  07 मार्च :महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातल्या अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता देशातील सर्व प्रमुख शहरातल्या मंदिरे, ऐतिहासिक इमारती, मॉल आणि मार्केटमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी घातपात घडवण्यासाठी पाकिस्तानमधून 10 दहशतवादी गुजरातमध्ये घुसल्याचा संशय गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद या संघटनांशी संबंधित असल्याचा गुप्तचरांचा संशय आहे. दहशतवादी गुजरातहून देशात इतर शहरांत पोहोचले असण्याची शक्यता गृहित धरून नवी दिल्ली, मुंबईसह सर्व महत्त्वाच्या शहरांत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर लखनौ, जयपूर, विजयवाडा, भोपाळ, चंदिगड, अहमदाबाद, पणजी या शहरांमध्येही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून कें द्रानेही तातडीने एनएसजी कमांडोंची चार पथके गुजरातमध्ये धाडली असून, सुमारे 200 जवानांनी राज्यातील प्रमुख विमानतळे, रेल्वे स्थानके, मॉल्स, सरकारी कार्यालयांना कडे केले आहे. यावरूनच गुजरातला असलेल्या धोक्याची तीव्रता समोर येते.

मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

गुजरातच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (रविवारी) सुरक्षेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुंबईचे पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांच्यासह इंटेलिजन्स ब्युरो तसंच रॉ या गुप्ततर संघटनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून या बैठकीची माहिती दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close