नाशिकजवळ भूमाता ब्रिगेडला अडवलं, तृप्ती देसाईंसह कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

March 7, 2016 7:05 PM0 commentsViews:

trupti_desi3नाशिक – 07 मार्च : त्र्यंबकेश्वर मंदिराकडे कूच करणार्‍या रणरागिणी भूमाता ब्रिगेडला नाशिकजवळ थांबवण्यात आलंय. ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सिन्नरजवळ काही कार्यकर्त्यांसह त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. नाशिक-पुणे हद्दीजवळ त्यांना थांबवण्यात आलंय.

शनी शिंगणापूरच्या शनिमंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना जाऊ देण्याची मागणी करत भूमाता ब्रिगेडने आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर या ब्रिगेडने आपला मोर्चा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराकडे वळवलं. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश द्यावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी केली. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश करणार असा इशारा दिला होता. आज या मंदिरात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंसह कार्यकर्त्या त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्या होत्या. पण, कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी ब्रिगेडचा ताफा नाशिक-पुणे हद्दीजवळच थांबवला आणि देसाईंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आम्ही शांततेनं आंदोलन करत असताना आम्हाला का थांबवलं असा सवाल देसाई यांनी यावेळी केला.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये वेगळंच नाट्य रंगलं. साध्वी हरसिद्धिगिरी यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला प्रवेशाला समर्थन दिलंय. महिलांना प्रवेश दिला नाही तर उपोषणाला बसणार असा इशाराच साध्वी हरसिद्धीगिरी यांनी दिलाय. देवस्थान कमिटीच्या आवारात मोठा गोंधळ झाला. साध्वी आणि देवस्थान महिला कमिटीच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. आणि हरसिद्धीगिरी यांना देवस्थानच्या समितीच्या सदस्यांनी मंदिराच्या आवारातून बाहेर काढण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close