तृप्ती देसाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात

March 8, 2016 11:01 AM0 commentsViews:

sdasdaspy

नाशिक – 08 मार्च : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आंदोलनासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंसह त्यांच्या अन्य सहकारी महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलं. दरम्यान, काहीही झालं तरी त्र्यंबकेश्वरला जाणारच, असा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अद्यापही तणावाचं वातावरण आहे.

नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थान, स्थानिक नगरपरिषद आणि ग्रामस्थांचा भूमाता ब्रिगेडच्या मागणीला तीव्र विरोध आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातील आंदोलनासाठी नाशिक जिल्हय़ात दाखल झालेल्या तृप्ती देसाईंसह अन्य महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना केलं होतं. मात्र, नारायणगाव इथून तृप्ती देसाईंसह त्यांच्या निवडक सहकारी महिलांनी पुन्हा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने कुच केले.

दरम्यान, नाशिक जिल्हय़ातील नांदूर-शिंगोटे गावाजवळ पोलिसांनी देसाईंना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे. तथापि, त्र्यंबकेश्वरला जाणार्‍यावर देसाई ठाम असल्याने पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close