तेलंगणाला मिळणार गोदेचं पाणी, मेडीगट्टा प्रकल्पाला सरकारचा हिरवा कंदील

March 8, 2016 5:54 PM0 commentsViews:

cm_and_ckraoगडचिरोली – 08 मार्च : जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर मेडीगट्टा प्रकल्प बांधायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या भेटीमध्ये या करारावर सह्या झाल्या. एकूण 5 प्रकल्प बांधायला राज्य सरकारनं मान्यता दिलीये. यामुळे गोदावरी नदीचे पाणी तेलंगाणाच्या सिंचनासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकारने गडचिरोली जिल्ह्यातल्या गावांचा विचार केला नाही, असा आरोप होतोय.

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर तेलंगाणा सरकार मेडीगट्टा कालेश्रवर या बहुप्रतिक्षित सिंचन प्रकल्पाचं बांधकाम करणार आहे. हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर होणार असून प्रकल्पामुळे बारमाही पीक घेऊन शेती करणारे वीस गावं पाण्याखाली जाणार आहेत. सर्वेक्षणाच्या नावाखाली तेलंगणा सरकारची दंडेलशाही सुरू असतांना नागरीकांमध्ये संताप आहे. राज्य सरकारनं या प्रकल्पाला मान्यता दिल्याच्या वृत्तानं सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये विस्थापनाच्या भीतीनं दहशत पसरली आहे. शंभर ते 104 मीटर उंचीच्या या सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातली वीस गावं बुडणार आहेत. शेतीच्या दृष्टीने गोदावरी नदीच्या तीरावरील अत्यंत समृद्ध भाग असून मिरची, धान, तीळ, कापूस ही पिकं इथ घेतली जातात आता या प्रकल्पासाठी सोन्यासारखी जमीन बुडणार असल्यानं शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close