आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

March 9, 2016 9:22 AM0 commentsViews:

vidhan

मुंबई – 09 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, मंत्र्यांचे दुष्काळी दौरे, डान्सबार, राज्याची ढासळलेली अर्थिक परिस्थिती आणि अधिकार्‍यांचा मनमानी कारभार या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे हे अधिवेशन खर्‍या अर्थाने सरकारसाठी कसोटीचं ठरणार आहे.

राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 9 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान अधिवेशन चालणार असून 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, शेतकऱयांच्या आत्महत्या, शेतकऱयांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, पाणी टंचाई, डान्सबार आदी अनेक विषय या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित कायद्यांसह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्याचे सरकारपुढे आव्हान असणार आहे.

दरम्यान, आज पहिल्या दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव हे दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर अभिभाषण करणार आहेत.राज्य सरकारने दुष्काळा बाबतीत केलेल्या उपाययोजना आणि राज्य सरकारच्या आगामी संकल्प या मुद्द्याचा राज्यपाल यांच्या अभिभाषणात समावेश असेल. तर राज्यपाल यांच्या अभिभाषणा पुर्वी विरोधक सभागृहा बाहेर आणि समिती कक्षात घोषणाबाजी करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close