‘चारा पाणी बंद, डान्स बार सुरू'; विरोधकांची घोषणाबाजी

March 9, 2016 12:59 PM0 commentsViews:

Govenor23

मुंबई – 09 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांसमोर अभिभाषण करायला सुरुवात केली, मात्र दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, डान्सबार बंदी, कायदा-सुव्यवस्था आदी मागण्यांबाबत विरोधकांनी सुरुवातीपासूनच सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्यातही राज्यापालांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं, पण सुरुवात मराठीत मात्र संपूर्ण भाषण इंग्रजीत केल्याने, विरोधकांनी त्याविरोधातही घोषणाबाजी केली. ‘मराठीत बोला, मराठीत बोला’ अशा घोषणा देत विरोधकांनी राज्यपालांकडे मराठीत भाषण करण्याची मागणी केली.

राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कर्जमाफी झाली पाहिजे, डान्सबार सुरू करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, चारा पाणी बंद डान्स बार सुरू, अशा घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं.

दरम्यान यावर्षी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी आतापर्यंत 2500 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारकडून आतापर्यंतची सर्वाधिक 3049 कोटी रुपयांची मदत मिळाली असल्याचं राज्यापालांनी अभिभाषणात सांगितलं. तसंच, दुष्काळप्रश्नी राज्य सरकार संवेदनशील असून, सर्वतोपरी मदत करण्यास सरकार कटीबद्ध आहे. दुष्काळग्रस्तांसाठी 2536 कोटींची मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुष्काळी जनतेचे 33 टक्के वीजबील माफ करण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी दिली.

दुष्काळनिवारणासाठी राज्य सरकारकडून गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली असून, 5 हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत असल्याचं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close