श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमावरून राज्यसभेत गदारोळ

March 9, 2016 1:38 PM0 commentsViews:

rajyasabha231

नवी दिल्ली – 09 मार्च : आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी यमुनेच्या किनार्‍यावर आयोजित केलेल्या एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रमावरून आज (बुधवारी) राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला लक्ष्य केलं.  कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांच्याविरोधात आम्ही नाही. पण या कार्यक्रमामुळे देशाच्या पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन होणार असेल तर त्याबद्दल प्रश्न उपस्थित केलाच पाहिजे, असं ते म्हणाले.

तसंच, या कार्यक्रमासाठी भारतीय सैन्याचा ज्या पद्धतीने वापर करून घेण्यात आला. त्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.  श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाचा मुद्दा सध्या राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. हरित लवाद त्यावर बुधवारी निर्णय देणार आहे. त्यामुळे सभागृहाच्या नियमाप्रमाणे एखाद्या विषयावर लवादाचा निर्णय प्रलंबित असताना त्यावर सभागृहात चर्चा घेतली जाऊ शकत नाही, असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेचे सभागृह नेते अरूण जेटली यांनी हरित लवादाच्या निर्णयाची वाट पाहा, असं विरोधकांना सांगितलं.

दरम्यान, यमुना नदीच्या पात्रात आयोजित करण्यात आलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. तर श्री श्री रवीशंकर यांनी मात्र यावर राजकारण होऊ नये असं आवाहन ट्विट करून केलं आहे. या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना करतो. सर्व संस्कृती, देश, धर्म, विचारसरणी यांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम आहे. सर्वांनी एकत्र येऊ यात, असं म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close