कोकणात बेसुमार जंगलतोड

March 15, 2010 1:46 PM0 commentsViews: 173

दिनेश केळुसकर, रत्नागिरी 15 मार्चकोकणात सुरू असणार्‍या बेकायदा आणि बेसुमार जंगलतोडीच्या विरोधात चिपळूणमधील सामाजिक संघटना गेली 3 वर्षे आवाज उठवत आहेत. 10 मार्चला या संघटनांनी मोर्चाही काढला. पण सरकारने या जंगलमाफियांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. आता वनविभागाने बेकायदा लाकूडसाठ्यांचे पंचनामे सुरू केलेत. पण कारवाईचे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.दोन दिवसांपूर्वी या संघटनांनी चिपळूणच्या थ्री एम पेपर मिलमध्ये असलेला प्रचंड लाकूड साठा वनविभागाच्या निदर्शनास आणला. आता वनविभागाने याचे पंचनामे सुरू केले आहेत. पण मुळात प्रश्न हा आहे की, वनविभागाने हा लाकूडसाठा आधीच का तपासला नाही. या संघटनांनी 22 सप्टेंबर 2009 ला राज्याच्या वनसचिवांकडे तक्रार दाखल केली होती.त्यावरून राज्याच्या प्रधान वनसचिवांनी कोल्हापूरच्या वनसंरक्षकांना चौकशीचे आदेशही दिले होते. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही, असे या संघटनांचे म्हणणे आहे. राजकीय पुढार्‍यांच्या संरक्षणामुळेच जंगलमाफियांवर कारवाई होत नाही, असा आरोप या संघटनांनी केला आहे. जंगलतोड थांबली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

close