विजय मल्ल्यावरुन संसदेत गदारोळ, पळून जाण्यात सरकारचा हात असल्याचा आरोप

March 10, 2016 2:49 PM0 commentsViews:

Vijay Mallya213

नवी दिल्ली – 10 मार्च : संसदेत आज विजय माल्ल्या प्रकरणाचे पडसाद उमटले. बँकांकडून कर्जे घेऊन फरार झालेल्या विजय माल्ल्याला पकडण्यात सरकारला अपयश आल्याचा मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातच विजय माल्ल्या परदेशात पळून गेल्याने सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर याच मुद्द्यावर काँग्रेसने सभात्यागही केला. दरम्यान, सरकारनेच त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोपच काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केला.

विजय माल्ल्याच्यावर सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. अनेक सरकारी संस्थांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. बँकांनीही वसुलीसाठी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. सीबीआयने लूकआऊट नोटीस बजावलेली असतानाही मल्ल्या देश सोडून कसं जाऊ शकले असा सवालही काँग्रेसने विचारला. त्यावर उत्तर देताना, मल्ल्यांनी आधीची कर्ज फेडलेली नसताना युपीएच्याच काळात त्यांना नवीन कर्ज दिली गेली असा टोला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लगावला. तसंच यूपीएच्या काळात आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी देशाबाहेर कसे गेले असा उलट सवालही त्यांनी विचारला.

दरम्यान, सीबीआयने मल्ल्यांविरूध्द बजावलेल्या लूकआऊट नोटिसीत त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले गेले नव्हते. त्यामुळे इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्यांना अडवलं नाही अशी माहिती आयबीएन नेटवर्कला सूत्रांकडून कळली होती. या बातमीला जेटली यांनीही संसदेत दुजोरा दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close