मोदींना बदनाम करण्यासाठीच यूपीएने इशरतला दहशतवादी ठरवलं नाही -सिंह

March 10, 2016 4:26 PM0 commentsViews:

rajnath_singhनवी दिल्ली – 10 मार्च : इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रं गायब असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज(गुरुवारी) संसदेत केला. यापूर्वीच्या आघाडी सरकारने या प्रकरणात बर्‍याच कोलांटउड्या मारल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर केला. गुजरातच्या तत्कालीन नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच काँग्रेसने इशरत प्रकरणाचं कारस्थान रचलं असाही आरोप राजनाथ सिंह यांनी केलाय. इशरज जहाँ प्रकरणात भाजपच्या खासदारांनी लक्षवेधी मांडली होती, त्यावरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं.

2004 साली तथाकथित बनावट चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहाँवरून आज लोकसभेतलं वातावरण चांगलंच तापलं. या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला. याबद्दल भाजप खासदारांच्या एका गटाने आज सव्वाबारा वाजता लक्षवेधी मांडली.

भाजपच्या निशिकांत दुबे यांनी यूपीए सरकारच्या काळात फाईल झालेल्या दोन ऍफिडेव्हिट्स विषयी केंद्र सरकारकडून माहिती मागितली. यावर तापलेल्या वातावरणात चर्चा झाली. भाजप खासदारांनी तत्कालीन यूपीए सरकारला लक्ष्य केलं.

भाजप खासदार आणि इशरत प्रकरणातल्या तपास करणार्‍या तत्कालीन एसआयटीचे प्रमुख सत्यपाल सिंग यांनी या एसआयटीचं गठन आणि तिचं कामकाज यावर टीका केली. खासदार किरीट सोमय्या यांनी इशरतच्या पार्श्वभूमीची योग्य पडताळणी यूपीए सरकारने केली नव्हती असं सुचवलं.

या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने इशरतचं कारस्थान रचलं असा आरोप केला.काँग्रेसच्या खासदारांनी या चर्चेच्या वेळी सभात्याग केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close