आम्ही काय गोट्या खेळायला आलो का ?,अजितदादा-मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध

March 10, 2016 8:39 PM0 commentsViews:

मुंबई – 10 मार्च : आम्ही चर्चा करायची आणि मंत्री उपस्थित नाही. मग आम्ही याठिकाणी गोट्या खेळायला आलो का ? अशी शेलक्या शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली. तर आम्ही जेव्हा विरोधक होतो तेव्हा आघाडीचा एकही मंत्री चर्चेला बसत नव्हता हेही लक्षात ठेवा असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.

dada_Vs_cm3आज विधानभवनात दुष्काळावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. दुष्काळी चर्चा करताना मंत्री उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही चर्चा करायची आणि मंत्री उपस्थित नाही. मग आम्ही याठिकाणी गोट्या खेळायला आलो का ? असे हातवारे करत सत्तारुढ पक्षावर टीका केली. जर मंत्री नसतील तर सभागृहाचं कामकाज तहकूब करा अशी मागणीच पवारांनी केली. पण तात्काळ मुख्यमंत्री सभागृहात आले. पृथ्वीराज चव्हाण एक पाण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते त्यासाठी मी सभागृहाबाहेर गेलो होतो असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण अजित पवारांनी आम्हीही सत्तेत होतो पण दुष्काळासारख्या नाजूक विषयावर चर्चा सुरू असतांना कधी बाहेर गेलो नाही अशी टीका केली. अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत आम्ही विरोधात असताना तुमचे मंत्री उपस्थित रहायचे का ? असा सवालच विरोधकांना विचारला.

अजित पवारांनी नंतर आपला मोर्चा जिल्हाधिकार्‍यांकडे वळवला. राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना मस्ती आली आहे. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्याचे,महसूलमंत्र्याचे ऐकत नसतील तर अशा अधिकार्‍यांना त्यांची जागा दाखवा असं आव्हानच अजित पवार यांनी केलं. तसंच “खडसे, तुम्ही शेतकर्‍यांच्या मनातील मुख्यमंत्री आहात. शेतकर्‍यांसाठी तातडीने निर्णय घ्या आणि पुण्य पदरात पाडून घ्या असा टोलाही अजित दादांनी खडसेंना लगावला. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल असे विषद करताना शेतकर्‍यांना पूर्ण कर्ज माफी करा, वीज माफी करा, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना 3000 रुपये पेन्शन सुरू करा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी करा आदी मागण्याही अजित पवारांनी केल्यात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close