मुंबईच्या अंधेरी भागात अज्ञात व्यक्तींनी जाळली रिक्षा

March 11, 2016 9:42 AM0 commentsViews:

Andheri Auto Burn

मुंबई – 11 मार्च : कांदिवलीतील चारकोप इथल्या भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयाची काल मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच रात्री 10.30 नंतर पक्षाच्या काही अज्ञात हल्लेखोरांनी अंधेरी आरटीओ कार्यालयाबाहेरील रिक्षा जाळल्याची घटना घडली आहे.

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षा परवाना वाटपाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली होती. परप्रांतियांना रिक्षांचे परवाने देण्यामागे आर्थिक-राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला होता. तसंच रस्त्यावर येणार्‍या नवीन रिक्षा जाळाव्यात, असं कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. या वक्तव्यानंतर आमदार सागर यांनी राज ठाकरेंना आव्हान देत त्यांनी स्वतः रिक्षा जाळावी आणि नंतर कार्यकर्त्यांना सांगावं, असं म्हटलं होतं.

यावरून मनसे कार्यकर्त्यांनी आज सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना ताजी असतानाच आता काही अज्ञात व्यक्तींनी अंधेरी इथल्या चार बंगला परिसरातल्या आरटीओच्या कार्यालयाबाहेरील रिक्षा जाळली. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी तर ही रिक्षा जाळली नाहीना अशी शंका व्यक्त होतं आहे. पण मनसेनं अजूनतरी या कृत्याची कुठल्याच पातळीवर जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दरम्यान, रिक्षा जाळल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close