मी भारत सोडून पळालेलो नाही, विजय मल्ल्यांचा दावा

March 11, 2016 10:00 AM0 commentsViews:

Vijay Mallya--621x414

11 मार्च : आपण देशातून पळालो नसून व्यावसायिक असल्यानं कामासाठी परदेशात आलो आहे, असं उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. मी आंतरराष्ट्रीय उद्योगपती आहे. मी अनेकदा भारताबाहेर प्रवास करतो. मी भारताबाहेर पळालेलो नाही, मी फरार नाही असं विजय मल्ल्या यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. भारतीय खासदार या नात्याने मी कायद्याचा पुर्ण आदर करतो. आपली न्यायव्यवस्था आदरणीय आहे. मात्र मिडियाने ट्रायल घेऊ नये असंही त्यांनी म्हणलं आहे.

विजय मल्ल्या देश सोडून पळून गेल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विजय मल्ल्या लंडनला पळून गेल्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं असताना संसदेतही काल (गुरुवारी) त्याचे पडसाद उमटले. मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यामागे गुन्हेगारी कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे भाजपने या आधीच्या काळात मल्ल्या यांना कर्ज देण्यात आल्याचा दावा करत मल्ल्या आमच्यासाठी काही संत नाहीत असं सांगत जोरदार प्रत्युत्तर दिलं.

विजय मल्ल्याच्या देशाबाहेर जाण्यावर सर्व थरातून टीका होताच त्यांनी आज खुलासावजा ट्विट केलं आहे. ‘मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक आहे. मी वारंवार भारतात आणि भारताबाहेर प्रवास करीत असतो. मी देशातून पळून गेलेलो नाही, आणि मी फरारीदेखील नाही. याबद्दलची चर्चा निरर्थक (rubbish) असल्याचेही मल्ल्या यांनी म्हटलं आहे. तसंच, भारतीय संसदेचा सदस्य (खासदार) म्हणून मी या भूमीतील कायद्याचा आदर करतो आणि त्याचे पालन करेन. आपली न्यायव्यवस्था चांगली व आदरणीय आहे, परंतु माध्यमांमध्ये हा खटला (मीडिया ट्रायल) चालवायला नको. खोटी माहिती आणि अब्रुनुकसानप्रकरणी एका चॅनलवर दावा ठोकण्याचे संकेतही विजय मल्ल्या यांनी दिले आहेत.

दरम्यान, विजय मल्ल्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आलीय. मल्ल्याला देशाबाहेर पळून जायला सीबीआयनं मदत केली की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे. ऑक्टोबर 2015मध्ये सीबीआयनं मल्ल्याबाबत लुकआऊट नोटीस काढली होती. मल्ल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला तर त्याला ताब्यात घ्या, असं या नोटिशीत म्हटलं होतं. पण नोव्हेंबरमध्ये ही नोटीस बदलण्यात आली, आणि ताब्यात घेण्याची गरज नाही, असं म्हणण्यात आलं होत. त्यामुळे, हा बदल कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, हे पहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close