गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून भाजपला घरचा आहेर

March 11, 2016 1:52 PM0 commentsViews:

beef ban12

मुंबई – 11 मार्च : गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून भाजपच्या भीमराव धोंडेंचा सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर आल्यानंतर लागू झालेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचा फेरविचार करून, त्यामध्ये गरिब शेतकर्‍यांना काही सूट देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या आवारात IBN लोकमतला सांगितलं.

विधानसभेमध्ये राज्यातील दुष्काळी स्थिती आणि सरकारी उपाययोजना यावर कालपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भीमराव धोंडे म्हणाले की, दुष्काळी स्थितीमुळे राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी गोवंश हत्या बंदी विधेयकातील काही तरतुदींचा फेरविचार केला गेला पाहिजे. गरिब शेतकर्‍यांकडील बैलासारखी जनावरे विकण्याचा आणि त्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा अधिकार त्यांना दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर ज्या गरिबांना गरज असेल त्यांना गोमांस खाण्याची सूटही दिली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच सरकारच्या निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी मागणी केल्यामुळे ऐन अधिवेशनात भाजप अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close