खाकी हाफ पँटच्या जागी आता फुलपँट; संघाच्या गणवेशात बदल

March 13, 2016 2:05 PM1 commentViews:

राजस्थान – 13 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता हाफ पँटची जागा तपकिरी रंगाच्या फुलपँटने घेतली असून, याबाबत आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यापुढे स्वयंसेवक खाकी हाफ पँटच्या जागी फुलपँन्ट परिधान करतील, अशी माहिती संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिली. राजस्थानच्या प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

केशव बळीराम हेडगेवारांच्या नेतृत्वाखाली 1925 साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय राजकारणातला दुर्लक्ष न करता येण्याजोगा प्रवाह राहिलेला आहे. कडक शिस्तीत तयार झालेली स्वयंसेवकांची पथकं आणि तळागाळात पोचून काम करणारे कार्यकर्ते ही संघाची ओळख आहे.

पण याबरोबरच उजव्या विचारसरणीकडे झुकलेली संघटना म्हणन संघाकडे बघितलं जातं. काळानुसार न बदलणारी संघटना अशी संघाची त्याच्या टीकाकारांकडून काहीशी हेटाळणी केली जाते. यावरच उत्तर म्हणून की काय, संघाने आपली ओळख बनलेला पांढरा शर्ट आणि खाकी हाफपँट हा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतली आहे. आता संघाचा स्वयंसेवक पांढरा फुल शर्ट आणि तपकिरी फुल पँट अशा वेशात दिसणार आहे.

UNIFORM NOW AND DEN

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत अलीकडे बदल होऊ लागलाय. काहीशी ब्राम्हणी पगडा असलेली संघटना म्हणून संघ ओळखला जायचा. पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही वर्षांपूर्वी या समजाला छेद दिला. एक दलित व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते असं भागवत यांनी तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

फक्त हेच नाही तर महाराष्ट्रात अलीकडे महिलांच्या मंदिर प्रवेशावरून पेटलेल्या वादातही संघाने उदारमतवादी भूमिका घेतली.

एकंदरितच, संघाला आता आपली व्याप्ती आणखी वाढवायची आहे. त्यासाठी तरुणाईला जास्तीत जास्त आपल्याकडे वळवणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. हाफपँट जाऊन फुलपँट असेल किंवा महिलांच्या मंदिर प्रवेशाला पाठिंबा असेल, यातून संघाचा युथ कनेक्ट वाढवण्याचा अजेंडा असावा असंच दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Yashdeep Joshi

  कालबाह्य गणवेश बदलणे आणि महिलांना मंदिरात प्रवेशाला पाठींबा देणे या संघाच्या दोन्ही निर्णयांचे स्वागत करायला हवे.

  मला स्वतःला हि गोष्ट सातत्याने खटकत होती – कि एका बाजूला काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी आंदोलन करणारे लोक पठाणी गणवेशात हातात “एके-४७ बंदुकी” घेऊन उभे राहतात आणि दुस-या बाजूला अखंड भारतासाठी आग्रही असणारे संघाचे लोक त्यांच्यासमोर अर्ध्या चड्डीवर “भारतमातेचा झेंडा” घेऊन उभे राहतात, हि कल्पनाच करवत नव्हती.

  पूर्वीचे संघाचे लोक अक्षरशः पूर-भूकंप अशा NATURAL DISASTER असलेल्या ठिकाणी मदतकार्यासाठी अर्ध्या चड्डीवर जात होते, जे अत्यंत हास्यास्पद होते.

  मला प्रामाणिकपणे असे वाटते, कि, संघाचा स्वयंसेवक हा एखाद्या सैनिकाप्रमाणे वाटला पाहिजे. किमान पूर-भूकंप-सुनामी अशा ठिकाणी स्वयंसेवकांना पाहून गरिबांना मानसिक आधार मिळाला पाहिजे.

  इज्राईलचे सैनिक एखाद्या अतिरेक्यांनी वेढलेल्या गावात उतरले, कि तेथील अतिरेक्यांच्या तोंडाला फेस येतो, तसेच स्वयंसेवक पाहून देशविघातक शक्ती घाबरल्या पाहिजेत, असे मला वाटते. किमान आज तरी असे होत नाही.

  एखाद्या बीचवर अर्ध्या चड्डीवर जाणे आणि एखाद्या वैचारिक चळवळीत विचारवंतांनी अर्ध्या चड्डीवर बैठक मांडणे यात निश्चितच फरक आहे, आणि संघाने पूर्वीच हा बदल स्वीकारला पाहिजे होता .

close