महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक

March 14, 2016 10:50 PM0 commentsViews:

1324938_Wallpaper1

मुंबई – 14 मार्च : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची 11 तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या सेशन्स कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता छगन भुजबळ चौकशीसाठी हजर झाले होते. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा आणि फेमा या दोन कायद्याअंतर्गत भुजबळ यांची चौकशी करण्यासाठी त्यांना हजर रहायला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, भुजबळ ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झाले.

गेल्याच महिन्यात छगन भुजबळ, पंकज, समीर भुजबळ यांच्यासह 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

याआधी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मुलगा पंकज यांना गेल्या महिन्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.

ईडीच्या कार्यालयात प्रवेश करण्याआधी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्यावर राजकीय सूड घेतला जात असून मी त्याचा बळी ठरलो असल्याचे सांगितले. चौकशी करणार्‍या यंत्रणेला मी सहकार्य करील, असं ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close