राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे भुजबळांच्या पाठीशी – शरद पवार

March 15, 2016 2:00 PM0 commentsViews:

Chagan Bhujbal2131 with pawar

नवी दिल्ली – 15 मार्च : भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे हे कारस्थान आहे. ही अटक राजकीय सूडातून झाली असून राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळ यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आम्ही त्यांच्यासाठी कायद्याने लढा देऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर बोलत आहेत, त्यावरुन कळतं आहे की, भुजबळांवरील अटकेची कारवाई राजकारणाने प्रेरित असल्याचं पवार म्हणाले. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळांसाठी कायदेशीर लढाई लढू. मात्र, महाराष्ट्र सदनाबाबतचे निर्णय हे काही एकट्या भुजबळांनी घेतलेले नाही, तर मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत, असंही पवार म्हणाले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची इमारत कुणी पाहिली असेल, तर कुणालाही कळेल की, ती अतिशय चांगली आहे, असेही पवार यावेळी सांगितले.

छगन भुजबळ यांना काल रात्री ईडीने अटक केल्यानंतर नाशिकसह संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. कोठेही कायदा आणि सुवस्थेला धक्का पोहोचू नये म्हणून शरद पवार यांनी कोणीही जाळपोळ, तोडफोड करू नका, असं अवाहन केलं आहे. दरम्यान, विधानसभेतही भुजबळांच्या समर्थात विरोधकांनी गोंधळ घातला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close