भुजबळांवरील अटकेची कारवाई कायद्यानुसारच – मुख्यमंत्री

March 15, 2016 2:27 PM0 commentsViews:

Devendra fadnavis in VS

मुंबई – 15 मार्च : छगन भुजबळ यांच्यावरील अटकेची कारवाई ईडीकडून सखोल तपास आणि पूर्ण पुरावे हाती आल्यानंतरच करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत स्पष्ट केलं. भ्रष्टाचाराविरोधात कायद्यानुसार कारवाई करणारच, घोटाळे कोणत्याही परिस्थितीत दाबणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सभागृहात या मुद्यावर गदारोळ करून विरोधक न्यायप्रक्रिया आणि तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आपले सरकार कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. घोटाळयांमध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणारच. आमचं सरकार घोटाळे दाबण्याचं काम करणार नाही, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

छगन भुजबळ यांच्यावर कुठल्याही सुडाच्या भावनेने कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर तपास यंत्रणांनी हातावर हात ठेऊन बसायचं का, असा सवालही त्यांनी केला. राज्यासमोर दुष्काळ, शेतकरी आत्महत्या यांसारखे महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न असताना विरोधक कायदेशीररीत्या करण्यात आलेल्या अटकेच्या मुद्यावर सभागृहाचे कामकाज होऊ देत नाहीत. हे अतिशय दुदैर्वी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close