उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अटक..,आर्मस्ट्रॉग भुजबळांचा प्रवास

March 15, 2016 8:07 PM0 commentsViews:

 

15 मार्च : छगन भुजबळ हे खरंतर एक लढवय्यं आणि उमदं ओबीसी नेतृत्त्वं…पण तेच ‘आर्मस्ट्रॉग’ भुजबळ आज भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडल्याने आणि पुरते अडचणीत आलेत. अटकेच्या कारवाईमुळे तर त्यांचंं राजकीय अस्तित्वच पणाला लागलंय. कारण एकटे भुजबळच नाहीतर त्यांच्या पुतण्या समीरही याच आरोपाखाली अटकेत आणि मुलगा पंकजचीही यापूर्वीच दोनदा चौकशी झालीये. कारण, अर्थातच बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक गैरव्यवहाराचं आहे.ट्रजिडी किंग भुजबळांच्या राजकीय प्रवासातील चढउतारांवरचा हा विशेष वृत्तांत…bhujbal_new

ओबीसी नेतृत्वं भ्रष्टाचाराच्या गर्तेत…छगन भुजबळ, राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ,ओबीसींचे स्वयंघोषित तारणहार…अशी नानाविध विशेषणं खरंतर भुजबळांनी स्वत:च्या हिमंतीवर मिळवलीत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही भुजबळांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. नव्हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचीही ते आस बाळगून होते. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असूनही भुजबळांनी नेहमीच आपली स्वतःची वेगळी ओळख आणि राजकीय महत्व कायम दाखवून दिलं. समता परिषदेच्या माध्यमातून तर भुजबळांनी थेट दिल्लीपर्यंत धडक दिली.

पण, एखादा लोकनेता कालऔघात पैशांच्या मागे धावला की, त्याचं पुढे नेमकं काय होतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे आर्मस्ट्रॉग….छगन भुजबळ….खरंतर तेलगी घोटाळ्यातही छगन भुजबळांचं नाव समोर आलं होतं. याच आरोपापोटी त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री गमवावं लागलं होतं. पण, अटकेची कारवाई टाळण्यात मात्र, ते त्यावेळी यशस्वी झाले होते. या आरोपातून सहिसलामत सुटताच भुजबळ राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी पवारांकडून सार्वजनिक बांधकाम खातं पदरात पाडून देखील घेतलं.

भुजबळ कसे अडकले?1324938_Wallpaper1

सार्वजनिक बांधकाम हे खरं तर फारपूर्वीपासून भ्रष्टाचारासासाठी बदनाम आहे. पण, या खात्याच्या मंत्र्याला अटक होण्याची होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधींची लाच स्वीकारल्यांचा आरोप भुजबळांवर आहे. ही लाच स्वीकारण्यासाठी भुजबळ कुटुंबियांनी चक्क बोगस कंपन्या स्थापन केल्या आणि त्याद्वारे करोडो रुपये हवालामार्फत आपल्या खात्यांवर वळते करून घेतले, असा आरोप ईडीने भुजबळ कुटुंबीयांवर ठेवलाय. याच प्रकरणात भुजबळ चुलता पुतण्यावर ही अटकेची कारवाई झालीये.

भुजबळांच्या अटकेचे पडसाद

भुजबळांच्या अटकेनंतर अपेक्षेप्रमाणेत त्यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात हिंसक पडसाद उमटलेत. जाळपोळ, रास्तारोको ही आंदोलनं देखील सुरू झालीत. नेहमीप्रमाणेच ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा डाव, अशा स्वरूपाचा कांगावा भुजबळ समर्थकांकडून होईल, किंबहुना आतापासूनच तसे आरोपही सुरू झाले आहे.भुजबळांविरोधातले पुरावे मिळवून देण्यात त्यांचे कधीकाळीचे निकटवर्तीयच आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. यातलं खरं किती खोटं किती माहित नाही.

पण मुळात मुद्दा असा आहे. आग असल्याशिवाय धूर हा निघतच नसतो. थोडक्यात काहीतरी ठोस पुरावे हाती आल्यानंतरच ईडीने थेट अटकेची कारवाई केली असण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या गळ्याभोवतीचा मफलर रुपी फास आता ईडीने चांगलाच कचकटून आवळल्याचं दिसतंय. बघुयात पुढे काय होतंय. अर्थात मागेपुढे भुजबळ यथावकाश या आरोपातून पुन्हा एकदा सहीसलमात सुटतीलही..पण त्यांच्यापुढे लागलेला भ्रष्टाचाराचा डाग मात्र, सहजासहजी नक्कीच पुसला जाणार नाही. म्हणूनच भुजबळांवर ओढवलेली ‘ईडीची पीडा’ पाहून तरी राजकीय नेत्यांनी यापुढे भ्रष्टाचाराचा मोह टाळावा अन्यथा त्यांचाही छगन भुजबळ होण्यास फारसा वेळ लागणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close