चहापानावर बहिष्कार

March 17, 2010 9:45 AM0 commentsViews: 1

17 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्याच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही, पुणे बॉम्बस्फोटाचा तपासात सरकारला कोणतेही यश आलेले नाही, वसईमधे पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज या सगळ्याच्या विरोधात विरोधकांनी हा बहिष्कार टाकला आहे. विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.दुष्काळ, महागाईचे सावट आशिष जाधव, मुंबईनिम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. वाढत्या महागाईने जनता हैराण आहे. अशा परिस्थितीत राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. चार महिन्यांच्या कारभारानंतर आघाडी सरकारकडे सांगण्यासारखे फार काही नाही. उलट, मोठ्या बांधकाम प्रकल्पांमधील सौदेबाजीच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत झालेला बेबनाव, मंत्र्यां-मंत्र्यांमधील जाहीर वाद, अशा एक ना अनेक समस्यांनी अशोक चव्हाण सरकार ग्रस्त झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, रखडलेली दुष्काळी कामे, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, वाढती महागाई, त्यात पुणे बॉम्बस्फोटाचा भरकटलेला तपास…यावरून विरोधकांकडून आरोपाच्या फैरी झडणार आहेत.या अधिवेशनात 21 विधेयकांसोबतच सरकार 25 मार्चला राज्याचे बजेटसुद्धा मांडणार आहे. तेव्हा कामकाज उरकतानाच विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे द्यावी लागतील, याची जाणीव सरकारला आहे.वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून आधीच सेना-भाजपमध्ये उभी फूट पडली आहे.अशा वेळी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तरी विरोधक एकत्र येतात का, ते आता पहायचे आहे.

close