‘या’ गावात देवासह लोकांनी काढला पळ, अख्ख गाव झालं खाली !

March 16, 2016 8:21 PM0 commentsViews:

विश्वनाथ उचले, सिंधुदुर्ग – 16 मार्च : जिल्ह्यातील एक संपूर्ण गाव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेलंय. या गावातून चक्क देवच पळून गेलाय. एवढंच काय गावातील गुर ढोर, माणसं देखील गाव सोडून सुट्टीवर गेली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण या गावात दर तीन वर्षांनी तीन दिवस शुकशुकाट असतो. हे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील वायंगणी गाव…sindhu_vaynagani43

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील हे आहे वायंगणी गाव. सुमारे 1500 च्या वर या गावात लोकवस्ती आहे. मात्रष आता या गावात आहे फक्त शुकशुकाट. गावातील शाळा, पोस्ट ऑफिस, पंचायत कार्यालय इतकंच नव्हे घराघरांना देखील टाळ ठोकण्यात आलंय. गावातील लोकांनी आपल्या देवाला घेऊन गावातून अक्षरशः पळ काढलाय. कुणी गावाच्या वेशीबाहेर मोकळ्या आकाशाखाली आपली चूल मांडलीये तर कुणी जवळपासच्या नातेवाईकांकडे तात्पुरता मुक्काम ठोकलाय. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, या गावावर असं कोणतं संकट आलं असावं की पूर्ण गाव असं ओस पडलंय?. तळकोकणातील हे संकट आहे गावपळणीच्या खूळसट प्रथेच…येथील लोक गेली शेकडो वर्षांपासून ही परंपरा पोसत आहेत. म्हणूनच हे गावकरी आपला संसार घेऊन गावाच्या वेशीबाहेर निघून गेलेत. तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणा मात्र गावकर्‍यासाठी हा आहे उत्सव परंपरेचा…

दर तीन वर्षांतून एकदा ही गावपळ आणि देवपळण गावकरी करतात. देवाच्या आदेशानेच आपण तीन दिवस गावाबाहेर जात असल्याचं गावकरी अभिमानाने सांगतात. एकदा देवाने कौल दिला की, गावकरी गाव सोडून निघून जातात आणि पुन्हा देवाचा कौल घेऊनच गावात परततात. याप्रथेमागे वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी म्हणतो वाईट शक्तींसाठी तीन वर्षांतून तीन रात्र गाव रिकामा
केला जातो. तर काहींच्या मते देवाचा आदेश म्हणून गाव आणि देव गावाबाहेर जातात. काही असो मात्र आजही तळकोकणात या लोकांमध्ये अंधश्रद्धेची कितीदहशत मनात घर करून आहे हे स्पष्ट होतंय.

विशेष म्हणजे आजच्या विज्ञानाच्या युगात शाळा, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय अशा शासकीय संस्था देखील या प्रथेत सहभाग घेतात. एवढंच काय तर आपला कारभार देखील तीन दिवस बंद ठेवतात तसा आदेशही काढला जातो. त्यामुळे अर्थातच अंधश्रद्धा निर्मुलन समिती कडून अश्या अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी किमान प्रशासनाने तरी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी होतेय.

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात दाभोलकरांच्या बलिदानानंतर अंधश्रद्धा निर्मुलनाचा कडक कायदा अस्तित्वात आलाय. मात्र, या कायद्याची किती कडक अंमलबजावणी केली जाते हे गावागावात चालणार्‍या अश्या अंधश्रद्धांवरून दिसून येतं. महाराष्ट्राला जरी उत्सव आणि परंपरांचा वारसा लाभला असला आणि वैज्ञानिक क्षेत्रात देश कितीही प्रगतीपथावर असला तरी अंधश्रद्धा निर्मुलनाच मोठ आव्हान आजही समाजापुढे कायमच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close