विपरीत परिस्थितीतही राज्याची आर्थिक स्थिती उत्तम – मुख्यमंत्री

March 17, 2016 5:15 PM0 commentsViews:

Devendra-fadnavis-in-VS1

मुंबई – 17 मार्च : विपरीत परिस्थितीतही राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते गुरूवारी विधानसभेत राज्यपलांच्या अभिभाषणाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्याचा आठ टक्के हा विकास दर देशाच्या विकासदरापेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं. मात्र, त्याचवेळी राज्यातील कृषी क्षेत्राची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या 15 वर्षात दुष्काळ आणि अन्य नैसर्गिक संकटामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर सातत्याने खालावत असून सध्या या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. राज्य मोठ्या कृषी संकटातून जात आहे. मात्र, या विपरीत परिस्थितीमध्येही लक्ष्य समोर ठेवून काम केल्यास राज्याची प्रगती होऊ शकते, हे आर्थिक पाहणी अहवालातील आकेडवारीवरून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

सरकार हे कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र, कर्जमाफी झाल्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती खरच सुधारेल का, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. जोपर्यंत आपली शेती आपल्या वातावरणातील बदलाला अनुकूल होणार नाही तोपर्यंत कृषी क्षेत्राला स्थैर्य मिळणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शेतकर्‍यांना फक्त कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकर्‍यांना वीज, पाणी आणि सिंचनासारख्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही मिश्किल चिमटे काढले. पृथ्वीबाबाचं दिल्लीत चांगलं वजन असल्याने त्यांनी दिल्लीतच असायला हवं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close