स्पेशल रिपोर्ट : ‘महानंद’चं लोणी खाण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र

March 19, 2016 8:24 PM0 commentsViews:

मंगेश चिवटे, 19 मार्च : असं म्हणतात की..,राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो..याचं ताजं उदाहरण आपल्याला सहकारातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या म्हणजेच महानंदच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायाला मिळतंय. महानंदा अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक चक्क एकत्र आलेत. याचसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट..

mahanand milkमहानंद दूध संघाच्या संचालकपदाची आपली वर्णी लागावी यासाठी सहकारातील सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी कंबर कसलीये. महानंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून चक्क विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये नुकतीच एक सर्वपक्षीय नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. त्यात दोन्ही काँग्रेससोबतच चक्क भाजपचे दिग्गज नेतेही उपस्थित होते म्हणे..,महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी अजित पवार आणि विखे-पाटील अगदी मांडीला मांडी लावून बसले होते.

विना सहकार नही उद्धार असे म्हणत महानंदाच्या दुधावरील लोणी चाखण्यासाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप आदी प्रमुख पक्ष एकत्रित आले आहे.

सहकार दुरूस्ती कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या संचालकपदी आता 21 पेक्षा अधिक संचालक असणार नाहीत. त्यातल्याही काही जागा महिलांसाठी आरक्षित आहेत म्हणून या सर्वपक्षीय नेत्यांनी नामी शक्कल लढवत संचालकपदासाठी आपल्या पत्नींना पुढे केलंय. राजकीय सोय लावण्यासाठी विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र असे भाग वाटून घेण्यात आलेत. प्रत्येकी 4 संचालक पदं हे सर्वपक्षीय नेते वाटून घेणार आहेत.

महानंदचं लोणी – कोण होणार बिनविरोध संचालक?

- महिला राखीव
- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (भाजप)
- माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस (राष्ट्रवादी)

 मराठवाडा
- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, फुलंब्री (भाजप)
- रामकृष्ण बांगर, औरंगाबाद (राष्ट्रवादी)
- राजेंद्र सूर्यवंशी, लातूर (काँग्रेस)
- विलास बडगे, बीड (राष्ट्रवादी)

- विदर्भ
- निळकंठ कोडे, नागपूर (काँग्रेस)
- विलास काटेखाय, भंडारा (राष्ट्रवादी)
- दयाराम पगाते, गोंदिया (भाजप)
- राजाभाऊ ठाकरे, यवतमाळ (भाजप)
 
पश्चिम महाराष्ट्र
- विनायक पाटील, सांगली (राष्ट्रवादी)
- डी.के. पवार, सातारा (राष्ट्रवादी)
- विष्णू हिंगे, पुणे (राष्ट्रवादी)
- वसंतराव जगदाळे, कराड (काँग्रेस)
- चंद्रकांत गणपतराव देशमुख, सांगोला (शेकाप – राष्ट्रवादी पुरस्कृत)

उर्वरित महाराष्ट्र
- प्रशांत गडाख, नेवासा (राष्ट्रवादी)
- राजेश परजणे, अहमदनगर (काँग्रेस)
- विक्रमसिंह रावल, धुळे (राष्ट्रवादी)
- चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार (काँग्रेस)

राज्यातले पक्ष छोट्या छोट्या विषयांवरून एकमेकांना विरोध करत असतात. अनेकदा तर फक्त विरोधासाठी विरोध करतात. विधिमंडळाचं महत्त्वाचं कामकाज पक्षांच्या भूमिकांसाठी बंद पाडतात. पण हा विरोध काही वैचारिक नसतो. तत्त्वांचाही नसतो. हे सिद्ध होतं महानंदाच्या या उदाहरणावरून. महानंदाचं लोणी हातातून जाण्यापेक्षा वाटून खाललं तर वाईट काय ?, अशी सोयिस्कर भूमिका घेणारे हे पक्ष दुष्काळाच्या विषयावरही एकत्र येऊन उपाययोजना आखतील का? हेच पाहायचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close